
>> आशुतोष बापट
कला, संस्कृती, परंपरा यांनी भरलेला हा कोकणचा प्रांत. इथे गावोगावी आपल्याला विविध कला आणि त्यांचे सादरीकरण करणारे कलाकार भेटत राहतील. कोकणच्या प्रत्येक प्रांताची खास अशी एक कलासंस्कृती राहिलेली आहे. ती कला इथला सर्वसामान्य माणूस मनापासून जोपासताना दिसतो. या कला केवळ विरंगुळा न बनता त्या समाजाला प्रबोधन करणाऱयासुद्धा झालेल्या दिसतात. खेळे, नमन, जाखडी, शक्ती-तुरा, चित्रकथी, दशावतार, भजन-कीर्तन या सगळय़ा लोककला कोकण प्रांतात रुजल्या, विकसित झाल्या आणि त्यांचे कोकणी माणसाच्या मनावर मोठे गारुड आहे.
संगमेश्वर परिसराचा विचार करता नमन आणि शक्ती-तुरा या पारंपरिक लोककला इथे मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतात. नमनामध्ये काल्पनिक कथा, त्यावर आधारित गाणी सादर केली जातात. सुरुवातीला गणपतीचा मुखवटा धारण केलेला कलाकार रंगमंचावर येतो. मग त्या गणपतीचे नमन करून कार्पामाला सुरुवात होते. या प्रकारात विविध कथांतील पात्रांनुसार वेगवेगळे लाकडी मुखवटे तयार केलेले असतात, ज्याला सोंगे असे म्हणतात. हे लाकडी मुखवटे मुख्यत्वे शिवनीच्या लाकडाचे केलेले असतात. नमनाचा कपडेपट हा दशावताराच्या कपडेपटासारखाच असतो. आधी गणपती, मग गण, त्यानंतर नारद-अक्रूर यांचा प्रवेश असा साधारण नमनाचा क्रम असतो.
या खेळांचा मुहूर्त देवदिवाळीला होतो. गावोगावी नमनाचे खेळ करणारी मंडळे आणि त्यातले विशिष्ट कलाकार प्रसिद्ध आहेत. यांच्याच सोबतीने जाखडी नृत्य हेसुद्धा इथल्या स्थानिक माणसाच्या कलेचा आविष्कार समजला जातो. शक्ती-तुरा आणि जाखडी नृत्य यातून लोकप्रबोधन केले जाते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री दोन घटकांच्या करमणुकीतून दिवसभराचे श्रम विसरण्यासाठी या पारंपरिक लोककलांची सुरुवात झाली. यातून निखळ करमणूक तर होतेच, शिवाय संस्कृती संवर्धन आणि समाज प्रबोधन या गोष्टीसुद्धा साधल्या जातात.
नमनासारखीच किंवा त्याहूनही अधिक लोकप्रिय असलेली कला म्हणजे शक्ती-तुरा यांचा सामना होय. शक्ती-तुरा या संकल्पनेला आध्यात्मिक बैठकसुद्धा लाभलेली आहे. ही निव्वळ करमणूक नसून अध्यात्मावर, तत्त्वज्ञानावर आधारलेली कला आहे असे म्हणावे लागेल. हे सगळे विश्व प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने निर्माण झालेले आहे. या तत्त्वावर आधारित ही लोककला आधारित आहे. प्रकृती-पुरुष, शिव-शक्ती, माया-ब्रह्म या तत्त्वांवर आधारित ही संकल्पना आहे. शास्त्राचा आधार घेऊन केलेले भांडण म्हणजे शक्ती-तुरा ज्याला कलगी-तुरा असेही म्हटले जाते. यातला एक गट हा शिव उपासकांचा, तर दुसरा गट हा शक्ती म्हणजे देवी उपासकांचा असतो. हे दोन गट आमनेसामने येऊन त्यांचे शाहीर एकमेकांना प्राचीन धर्मग्रंथ, तत्त्वज्ञान, विविध पुराणकथा यांच्या आधाराने प्रश्न विचारतात. तो प्रश्न, त्या प्रश्नाचा रोख आणि त्याचा प्राचीन ग्रंथांशी असलेला संबंध ओळखून त्या प्रश्नांची फोड करणे म्हणजेच त्याचे उत्तर देणे हे दुसऱया गटाचे काम असते. यात ज्या गटाला प्रश्नांची उकल करता येणार नाही त्याचा पराभव होतो. एकाने प्रश्न टाकायचा आणि दुसऱयाने तो फोडायचा अशी याची संकल्पना.
शक्ती-तुरा परंपरा जोपासणे हे कुण्या येडय़ागबाळय़ाचे कामच नव्हे. त्यासाठी मुळात तुम्हाला काव्याचे अंग हवे. त्याच्या जोडीने तुमचे विविध धर्मग्रंथांचे सखोल वाचन हवे तरच तुम्ही उत्तम शाहीर होऊ शकता. तुमच्या प्रतिभेच्या आणि अभ्यासाच्या जोरावर तुम्ही प्रतिपक्षाला प्रश्न टाकू शकता किंवा त्यांनी टाकलेला प्रश्न सोडवू शकता. शक्ती-तुरा या परंपरेमध्ये गुरूला आणि त्यांच्या घराण्याला फार मोठे महत्त्व असते. प्रत्येक प्रयोगात शक्तीवाले आणि तुरेवाले सुरुवातीला आपल्या गुरू परंपरेचा उल्लेख आणि जागर करतात. शक्ती परंपरेत हैबती, गुरू गणपती, कवी भानुदास अशी, तर तुरा परंपरेत कवी रामचंद्र पंडित, शंभूराज, लक्ष्मण नलावडे अशी मातब्बर गुरू घराणी आहेत. यांची परंपरादेखील खूप मोठी आहे आणि अर्थात त्यांच्याकडे असलेल्या विद्वत्तेमुळे त्यांचा मानदेखील मोठा आहे.
शक्तीवाले म्हणजे देवीचे उपासक आणि तुरेवाले म्हणजे शिवाचे उपासक. शिव आणि शक्ती ही एकच तत्त्वे आहेत. त्यांच्यात वाद नाहीतच. या दोघांमुळेच तर ही पृथ्वी निर्माण झाली. सांख्य तत्त्वज्ञानसुद्धा हेच तर सांगते आणि हेच तत्त्वज्ञान आपल्याला ‘अर्धनारीश्वराच्या’ मूर्तीतून दृग्गोचर झालेले दिसते. शक्ती-तुरा ही वादावादी नसून एकमेकांचे ज्ञान जोखण्याची कला आहे. एकमेकांचा प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास किती सखोल आहे, त्यावर त्या व्यक्तीचे स्वतचे चिंतन-मनन किती केलेले आहे हे जोखण्याची ही संधी. याद्वारे सामान्यजनांसमोर मात्र ज्ञानाचा मोठा खजिना उलगडला जातो. संगमेश्वर-देवरुख परिसरातील गावोगावी ही शक्ती-तुरा मंडळे वसलेली आहेत. त्यांची गुरू परंपरा महान असून ते मोठय़ा अभिमानाने त्याचा उल्लेख करतात. एखादी व्यक्ती ही कुठल्या गुरूचा चेला आहे यावरूनही त्या व्यक्तीचे महत्त्व समजते.
निखळ मनोरंजनाबाहेर जाऊन तत्त्वज्ञान, अध्यात्म या गहन विषयाला हात घालणारी ही लोककला. नुसता गहन विषयाला हात न घालता ते विषय सोप्या भाषेत लोकांसमोर मांडणारी ही कला आणि यातले कलाकार हे खरोखर महान म्हटले पाहिजेत. शक्ती-तुरा किंवा कलगी-तुरा या लोककलेचे खेळ आता कोकणापुरते मर्यादित न राहता पुणे-मुंबई-कोल्हापूरसारख्या शहरांतूनही आता या कलेचे सादरीकरण केले जाते. त्याला प्रतिसादसुद्धा तेवढाच मोठय़ा प्रमाणावर मिळतो. कोकणच्या मातीत बहरलेल्या या लोककला जशा इथल्या मातीची ओळख सांगतात तशाच त्या या मातीत रुजलेल्या तत्त्वज्ञानाची महतीसुद्धा साऱया जगाला दाखवून देत आहेत.

































































