
दुर्गेश आखाडे,[email protected]
चकाचक, अत्याधुनिक स्वयंपाकघर आज घराघरांत असली तरी चुलीवरच्या जेवणाची चव सगळ्यांनाच चाखायची असते.
फू…फू… फुंकणीने फुंकर घालत चुलीवरच्या जेवणाचे ते दिवस… पुढे स्टोव्ह आले. स्टोव्हवर जेवण बनू लागले. पुढे मग रॉकेलची बोंबाबोंब सुरु झाली. रॉकेलसाठी रांगा लावायला लागायच्या. त्या त्रासातून मुक्तता मिळत सिलिंडर-गॅसवरच्या शेगडय़ा आल्या. घरोघरी मातीच्या चुली म्हणता म्हणता घरोघरी सिलिंडरच्या शेगडय़ा दिसू लागल्या. काही दिवसांनी पुढचा टप्पा म्हणजे इंडक्शन कुकरचा वापरही सुरु झाला. हे सर्व जीवन जगत असताना मोठमोठय़ा हॉटेल्सच्या बाहेर चुलीवरचे जेवण मिळेल असे फलक लागू लागले आणि मग पुन्हा चुलीवरच्या जेवणाच्या चवीसाठी खवय्येमंडळी चुलीवरचे जेवण मिळणाऱया हॉटेल्समध्ये जाऊ लागली. रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी गावामध्ये 1932 पासून चुलीवरचे पदार्थ बनवणारे एक छोटेखानी हॉटेल आहे. आज 86 वर्षांनंतरही चौथी पिढी चुलीवरच चहा, मिसळ, उसळ, भजी तयार करुन विकत आहे.
चुल पेटवायची म्हटलं की इंधन म्हणून लाकडांचा प्रश्न, पुन्हा होणारा धूर, धुरामुळे येणारा कळकटपणा या सर्वांपासून सुटका म्हणून चुलींची जागा शेगडय़ांनी केव्हाच घेतली होती. जीभेचे नखरे पुरवण्यासाठी खवय्यांना पण पुन्हा एकदा चुलीवरची चव आवडू लागली. लोक वेटरकडे चुलीवरच्या जेवणाची मागणी करतात आणि चुलीवरचे जेवण म्हणून ते थोडे जास्त दराने घेत खवय्ये उदरभरण करतात. आपल्याच घरातील चुलींनी आता हॉटेलमध्ये जागा मिळवली आणि त्यांचे मार्केटींग झाले हे कोणाच्या लक्षातही आलं नाही. हे चुलीवरचं जेवण आपल्या गावी किंवा आजोळी शहरात राहणाऱ या अनेकांनी खाल्लंय. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देत शेगडीवरच्या जेवणापेक्षा वेगळी चव म्हणून चुलीवरचे जेवण निश्चितच खवय्यांच्या पसंतीला पडतंय.
चुलीवरच्या जेवणाचं फॅड सर्वत्र पसरत असताना हरचेरीतील लिंगायत कुटूंबाचं श्री विश्वेश्वर उपाहारगृह गेली 86 वर्षे चुलीवरच खाद्यपदार्थ बनवत आहे. सध्या चांदेराई म्हणून प्रसिद्ध असलेला हा परिसर 1932च्या काळात हरचेरी म्हणून ओळखला जायचा. हरचेरी हे बंदर होतं. येथे माल घेऊन येणाऱया नौका यायच्या. नौकांमधील मंडळींची खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून उमा मिलिंद लिंगायत गुरव़ यांनी विश्वेश्वर उपाहारगृह सुरु केलं. केंबळय़ाच्या या उपाहारगृहात कांदाभजी, उसळ, मिसळ, चहाची सोय होऊ लागली. त्या काळात चुलीशिवाय पर्याय नव्हता. म्हणून गावातून लाकूडफाटा गोळा करुन चुलीवरच हे पदार्थ बनवले जात. त्यानंतर अनंत लिंगायत यांनी या उपाहारगृहाचा वारसा पुढे चालवला. चुली जाऊन स्टोव्ह आले, गॅसच्या शेगडय़ा आल्या. पण विश्वेश्वर उपाहारगृहाची चुल काही बंद झाली नाही. पुढे द्वारकानाथ लिंगायत आणि सतीश लिंगायत यांनी उपाहारगृह सुरुच ठेवले. या उपाहारगृहात आजही चुलीवरचे पदार्थ मिळतात. चौथ्या पिढीतील सतीश लिंगायत हे सध्या उपाहारगृह चालवतात. केंबळय़ाच्या उपाहारगृहाने आता बंदिस्त चिरे आणि कौलारु छपराचं रुप घेतलं आहे. 1977 मध्ये या उपाहारगृहाची डागडूजी करण्यात आली. मात्र चुलीवरचे खाद्यपदार्थ बनवण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली.
86 वर्षांनंतरही चुलीवरचे पदार्थ बनवण्याचे कारण सतीश लिंगायत यांनी सांगितले की, चुलीवरच्या खाद्यपदार्थांची चवच वेगळी असते. आम्हाला असं वाटतं की लाकडाच्या धूरामुळे चवीत थोडासा बदल होतो आणि लोकांना ते आवडतं. गॅसवरचा आणि चुलीवरचा पदार्थ यांच्या चवीतील फरक हा अनेकांना जाणवत असल्यामुळे चुलीवरच्या जेवणाला जास्त पसंती मिळते. आम्ही गेली 86 वर्षे उपाहारगृहातील पदार्थही बदलले नाहीत. आजही आम्ही फक्त मिसळ, उसळ, चहा आणि कांदाभजी विकतो असं अभिमानाने सतीश लिंगायत सांगतात. चूल पेटवायची म्हटलं की इंधनाचा प्रश्न आलाच. सतीश लिंगायत हा लाकूडफाटा विकत आणतात. दिवसाला दोन भाऱया लाकूड लागतं. साधारण एक भारी 30 रुपयांना पडते. अगदीच लाकूड नसले तर गावातून एकडून तिकडून जमवून लाकूड उपलब्ध केले जाते. पावसाळय़ापूर्वी मात्र लाकूड आणून ते माळय़ावर सुरक्षित ठेवावे लागते. कारण काजळी नदीच्या समोरच असल्याने या उपाहारगृहाला पुराचा फटका बसतो. 1982 आणि 2005 या सालात आलेल्या पुरात हे उपाहारगृह पूर्ण पाण्याखाली गेले होते.
चुलीवरच्या शेवया अमेरिकेत पोहोचल्या
या उपाहारगृहात चुलीवर शेवयाही बनवतात. थोडय़ा जाड आकाराच्या शेवया खवय्यांना आवडू लागल्या आहेत. गावातील भिंगार्डे नावाचे गृहस्थ एकदा उपाहारगृहात आले. शेवया घेऊन घरी गेले. अमेरिकेतून घरी आलेल्या मुलीने त्या शेवया खाल्ल्यानंतर त्या कुठून आणल्या असं विचारलं. ती दरवर्षी जेव्हा अमेरिकेतून येते तेव्हा शेवयांची ऑर्डर देते आणि जाताना विश्वेश्वर उपाहारगृहातील शेवया थेट अमेरिकेत घेऊन जाते.

























































