
जयेंद्र लोंढे । मुंबई
गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारा हिंदुस्थानचा फुटबॉल संघ यूएईत 5 जानेवारीपासून सुरू होणार्या एएफसी आशियाई स्पर्धेसाठी सज्ज झालाय. या वेळी या संघातून ‘लेफ्ट बॅक’ या पोझिशनला खेळणार्या सुभाशिष बोस याने दैनिक ‘सामना’शी संवाद साधला. तो या वेळी आत्मविश्वासाने म्हणाला, आगामी स्पर्धेत विजयासाठीच मैदानात उतरणार. स्पर्धेतील आव्हान खडतर असले तरी देशवासीयांना आनंद देण्यासाठी जीवाचे रान करू.
मुंबई सिटी संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबाबत काय सांगशील?
आयएसएलच्या यंदाच्या मोसमात आम्हाला आतापर्यंत चमकदार कामगिरी करता आलीय. आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे सध्या आयएसएलला ‘ब्रेक’ मिळालाय. पण आमचा संघ गुणतालिकेत दुसर्या स्थानावर आहे. मात्र अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी मेहनत करावी लागणार आहे.
लहान वयात तुझ्यावर नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अनुभव कसा होता?
खेळाडू व कर्णधार म्हणून दोन्ही भूमिका यशस्वीरीत्या पार पाडण्याचे प्रयत्न केले. एक चांगला अनुभव संपादन करता आला. यापुढे देशाचे नेतृत्व माझ्या खांद्यावर सोपवण्यात आल्यास तेही स्वीकारायला तयार असेन. कर्णधाराची जबाबदारी पार पाडताना खेळाडूंना सोबत घेऊन जावे लागते. त्यांच्यावर लक्ष द्यावे लागते.
हिंदुस्थानच्या गेल्या काही महिन्यांतील कामगिरीवर समाधानी आहेस का?
हिंदुस्थानी फुटबॉल संघ छान कामगिरी करतोय. आम्ही चीनसारख्या बलाढय़ संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. रँकिंगमध्ये आम्हाला कमालीची झेप घेता आलीय. खेळात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे.
एएफसी आशियाई स्पर्धेतील आव्हानाबाबत सांग…
हिंदुस्थानचा संघ या स्पर्धेत अ गटात आहे. यात यजमान यूएईसह थायलंड व बहरीन या देशांचाही समावेश आहे. तिन्ही देश तगडे आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान नक्कीच अवघड आहे. आम्हाला सर्वस्व पणाला लावावेच लागणार आहे.
आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानने कोणते टार्गेट ठेवलेय?
हिंदुस्थानी संघाला कोणत्या बाबींमध्ये सुधारणा करायची आहे याचे आकलन प्रशिक्षक करतीलच. आम्ही फक्त जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहोत. हिंदुस्थानातील फुटबॉलप्रेमींचा सपोर्ट आम्हाला मिळेल यात शंका नाही. त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहायचाय.
कोणते ध्येय डोळ्यांसमोर ठेवलेस?
देशासाठी प्रदीर्घ काळ खेळायचे आहे. युरोपमधील क्लबमधून चमक दाखवायचीय. रोनाल्डो व मेस्सी हे खेळाडू आवडतात. पण रियाल माद्रीदच्या मार्सेलो याला मी फॉलो करतो. तो ‘लेफ्ट बॅक’ या पोझिशनवर खेळतो. मीही त्याच पोझिशनवर खेळतो. त्यामुळे त्याचा खेळ बघायला आवडतो.


























































