
सामना प्रतिनिधी । आष्टी
लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टरची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेताना आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षक त्रिंबक पवळ यांना एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
14 डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात याबाबतची तक्रार दिली होती. तक्रारदार यांचा लाकुड वाहतुकीच्या ट्रक्टरची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी वनरक्षक त्रिंबक पवळ यांनी तक्रारदारांकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या तक्रारीवरुन घटनेबाबत खातरजमा करण्यात आली. पवळ वनरक्षक यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरुन 18 डिसेंबर रोजी आष्टी बस स्टँड परिसरात सापळा रचण्यात आला. बस स्टँडजवळ पवळ यांना तक्रारदारांकडून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्रिंबक सिताराम पवळ ( वय 57) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातंगर्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई श्रीकांत परोपकारी, पोलीस अधीक्षक एस.आर.जिरिगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुढे पाटील आणि पथकाने केली.



























































