चारा घोटाळ्यातील चाईबासाप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारा घोटाळ्यातील चाईबासा कोषागार प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना जामीन मंजूर झाला असला तरी ते तुरुंगातच राहणार आहे. चारा घोटाळ्यातील दुमका कोषागार प्रकरणीही त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणाची सुनावणी शिल्लक असल्याने जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना तुरुंगातच राहवे लागणार आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जामीनाला महत्त्व आले आहे.

चारा घोटाळ्यातील वेगवेगळ्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप आहेत. त्यांना यातील काही प्रकरणात शिक्षाही सुनावण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर झारखंडच्या राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी कोरोनापासून बचावासाठी त्यांना रिम्स संचालकांच्या बंगल्यात ठेवण्यात आले आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी आढळल्यानंतर सप्टेंबर 2013 मध्ये लालू प्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये ते जामिनावर बाहेर आले. मात्र, 23 डिसेंबर 2017 मध्ये त्यांना चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली. चाईबासा कोषागार प्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेपैकी अर्धी शिक्षा त्यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे. तर आणखी एका प्रकरणातील शिक्षपैकी अर्धी शिक्षा 9 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये लालूप्रसाद यादव जामीनावर बाहेर येण्याची शक्यता आहे. चाईबासा प्रकरणी अर्धी शिक्षा पूर्ण झाली असल्याने त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.