काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार तथा राज्याचे माजी दुग्ध व मत्स्य विकास मंत्री आनंदराव देवकते यांचे राजूर येथे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले.

दक्षिण सोलापूरमधून देवकते यांनी 1978 सालापासून 25 वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते. 1992-93 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात पक्षांतर्गत झालेल्या उठावात स्वत: शंकरराव चव्हाणनिष्ठ असूनदेखील देवकते यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. 1999 ते 2003 या कालावधीत त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही सांभाळले होते. नंतर ‘महानंदा’चे अध्यक्षपदही भूषविले होते.

2003 साली सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवकते यांनी शिंदे यांच्यासाठी आमदारकी सोडली होती. नंतर सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत देवकते यांना काँग्रेसने संधी दिली असता त्यांचा पराभव झाला होता.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच दक्षिण सोलापूर तालुक्यात शोककळा पसरले आहे.