ब्रॅडमन यांना 100 ची सरासरी गाठू न देणारे माधव आपटे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचे माजी कसोटीपटू, सलामीवीर आणि उद्योजक माधव आपटे यांचे निधन झाले. सोमवारी पहाटे सहा वाजता त्यांनी मुंबईमध्ये ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते.

आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1948 साली केली. फलंदाजीसह फिरकी गोलंदाजीही ते चांगली करत. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी विनू मंकड यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतले. त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या शेवटच्या इनिंमध्ये 100 ची सरासरी घेण्यापासून रोखले होते.

आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर 1952-53 या काळात त्यांनी सात कसोटी सामन्यात हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व केले होते. पाकिस्तानविरूद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी आपटे यांची संघात निवड झाली. यात त्यांनी उत्तम खेळ केल्याने त्यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही निवड झाली होती.

इंडीज दौरा गाजवला

पाच सामन्यांच्या मालिकेत आपटे यांनी सलामीला खेळताना एक शतक आणि अर्धशतकांसह 51.11 च्या सरासरीने 460 धावा केल्या होत्या. पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ते ठरले होते. हा विक्रम 18 वर्ष त्यांच्या नावावर होता. या दौऱ्यानंतर त्यांना पुन्हा हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्यांनी 67 सामन्यात 3336 धावा केल्या आहेत. यात सहा शतक त्यांनी झळकावली होती. क्रिकेटसह त्यांनी ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आणि मुंबईचे नगरपाल या दोन्ही पदावर त्यांनी काम केले होते.

आत्मचरित्रात गौप्यस्फोट

माधव आपटे यांनी ‘अ‍ॅझ लक वुड हॅव इट’ हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकात निवड समितीचे लाला अमरनाथ यांनी आपल्या वडिलांना दिल्लीतील कोहिनूर मिलच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याची मागणी केली होती. वडिलांनी नकार दिल्याने आपली निवड होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.