हिंदुस्थानी राजकारणातील ‘सुपरमॉम’ हरपली, सुषमा स्वराज यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
1977 मध्ये 25 वर्षांच्या वयात त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी परराष्ट्रमंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. विदेशात संकटामध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करून आईच्या मायेने मायदेशी आणणाऱया सुषमा स्वराज यांची ओळख ‘सुपरमॉम’ अशी होती. सुषमा स्वराज यांच्या निधनाने अवघा देश हळहळला आहे. सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने रात्री 10.15 वाजता एम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. स्वराज यांचे हृदयविकाराच्या तीक्र झटक्याने निधन झाल्याचे ‘एम्स’च्या डॉक्टरांनी जाहीर केले. सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी ‘एम्स’ मध्ये धाव घेतली. उद्या दुपारी तीन वाजता सुषमा स्वराज यांची अंत्ययात्रा निघणार असून लोधी रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल, कन्या बांसुरी असा परिवार आहे. 2016 मध्ये सुषमा स्वराज यांची किडनी ट्रान्सप्लांट झाली होती. प्रकृतीच्या कारणास्तव 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली नाही.

लोकप्रिय परराष्ट्रमंत्री
मितभाषी, प्रभावी वक्त्या, कणखर भूमिका मांडणाऱया सुषमा स्वराज लोकप्रिय नेत्या होत्या. 2014 ते 2019 त्यांची परराष्ट्रमंत्री म्हणून कारर्कीद गाजली. विदेशात संकटात सापडलेल्या शेकडो हिंदुस्थानी नागरिकांना ‘एअर लिफ्ट’ करून त्यांनी मायदेशी आणले. देश-विदेशात ‘सुपर मॉम’ अशी त्यांची ओळख होती. सोशल मिडियावर सक्रीय असणाऱया सुषमा स्वराज नागरिकांच्या ट्विटची तत्काळ दखल घेऊन समस्या सोडवत असत. प्रभावी वक्त्या असलेल्या सुषमा स्वराज यांच्या भाषणांनी जागतिक व्यासपीठावर दबदबा निर्माण केला. संयुक्त राष्ट्र संघातील सडेतोड भाषणाने त्यांनी देशवासियांची मने जिंकली होती. स्वराज यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेते, देशातील सामान्य नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

अखेरचे ट्विट
आज रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सुषमा स्वराज यांनी केंद्र सरकारचे 370 कलम हटवल्याबद्दल अभिनंदन करणारे ट्विटही केले. आयुष्यात मी याच दिवसाची वाट पाहत होते. पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार! शिवाय राज्यसभेत हे विधेयक मंजूर करणाऱया सर्व खासदारांनाही धन्यवाद. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न साकार करून सरकारने त्यांना खरी आदरांजली वाहिली असे ट्विट त्यांनी केले.