
मुंबईचे माजी महापौर आणि निष्ठावंत शिवसैनिक प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांचे सोमवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, मुलगी प्रांजल आणि मुलगा प्रसाद असा परिवार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांताक्रुझ येथील राजे संभाजी विद्यालयात विश्वनाथ महाडेश्वर यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर 14 वर्षांपूर्वी बायपास करण्यात आली होती. त्यानंतर नियमितपणे ते औषधे घेत होते. सोमवारीच केईएम रुग्णालयात जाऊन त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. मात्र मध्यरात्री दोनच्या सुमाराला त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना लगेचच महापालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, संजय पोतनीस, विलास पोतनीस, भाऊ कोरगावकर, ऋतुजा लटके, मनीषा कायंदे, सुनील शिंदे, माजी महापौर महादेव देवळे, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, विभागप्रमुख सुरेश पाटील, संदेश पारकर, यशोधर फणसे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी महाडेश्वर यांचे अंत्यदर्शन घेतले. महाडेश्वर यांच्या पार्थिवावर वांद्रे पूर्व येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षक ते महापौर
प्रचंड जनसंपर्क, अभ्यासूवृत्ती आणि मनमिळाऊ स्वभाव असलेल्या महाडेश्वर यांच्या राजकीय प्रवासाचा आलेख चढता राहिला. शाखाप्रमुख ते मुंबईचे महापौरपद असा प्रवास त्यांनी केला. महाडेश्वर हे पंतनगरातील शिवाजी हायस्कूलमध्ये प्राध्यापक होते. 1992 च्या दंगलीवेळी शाखाप्रमुख असलेल्या महाडेश्वर यांनी सहा महिने तुरुंगवास भोगला. 2002 मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून शिवसेनेकडून निवडून आले. 2003 मध्ये महाडेश्वर यांच्याकडे पालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद सोपवले. त्यानंतर 2007 आणि 2012 साली ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2017 मध्ये मुंबईचे महापौर म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 या काळात महाडेश्वर महापौर होते. वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांनी 2019ची निवडणूक लढवली होती.
मराठीसाठी आग्रही
शिवसेनेत सक्रिय असतानाही विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षकी पेशा जपला. शैक्षणिक क्षेत्रात तळमळीने ते काम करत राहिले. त्यांनी 1993 मध्ये प्रथम आपल्या विभागात स्वतः क्लास घेण्यास सुरुवात केली. सांताक्रूझ विभागातील स्थिती पाहता त्यांनी राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज सुरू केले. विभागातील गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे ही त्यांची धडपड होती. त्यातून त्यांनी प्रबोधन शिक्षण संस्था उभारली व सिव्रेट माईन हायस्कूल सुरू केले. मराठी भाषेतूनच संवादासाठी ते आग्रही असायचे. महापौर असताना महाडेश्वर हे दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचाच वापर करायचे. प्रसारमाध्यमांशीही महाडेश्वर फक्त मराठी भाषेत संवाद साधायचे. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांना प्रोत्साहन देणे आणि पालिकेच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी महाडेश्वर यांनी विशेष प्रयत्न केले.





























































