
माजी मंत्री प्रभाकर मोरे आज पंचत्वात विलीन झाले. मोरे यांच्या पार्थिवावर येथील वैंकुठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून मोरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रभाकर मोरे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. आज सकाळी 10.30 वाजता येथील प्रभात कॉलनीतील ‘तपोवन’ निवासस्थान येथून बाजारपेठमार्गे मोरे यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी महाडकर नागरिकांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली होती. यावेळी रायगड जिह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, किशोर जैन, प्रमोद घोसाळकर, युवासेनेचे विकास गोगावले, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, बिपीन महामूणकर, डॉ. चेतन सुर्वे, संजय भुस्कुटे उपस्थित होते.





























































