
‘केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवरील 40 टक्के करआकारणीमुळे कांद्याचे भाव गडगडले. ‘नाफेड’मार्फत किमान तीन हजार रुपये दराने सरसकट कांदा खरेदी करावी; अन्यथा शासनावर दबाव आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही,’ असा गर्भित इशारा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला. यावेळी नेवाशाचे तहसीलदार संजय बिराजदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
नेवासा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, मुळा उजवा कालवा रोटेशन सोडावे, केंद्राने कांदा निर्यात शुल्कआकारणीचा निर्णय मागे घ्यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्य़ा यावेळी शंकरराव गडाख म्हणाले, नाशिक-नगर जिह्यात कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. अनंत अडचणींवर मात करून शेतकरी कांदा पिकवितो. मात्र, तुटपुंजा भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 300 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने उशिरा घेतला; पण त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. कांदा निर्यातीवर 40 टक्के करआकारणीमुळे कांद्याचे भाव गडगडले. प्रतिक्विंटल 2410 रुपये या दराने कांदा खरेदी ‘नाफेड’मार्फत सुरू झाल्याचे सांगितले जाते. प्रतवारीप्रमाणे कांद्याला भाव मिळणार आहे, हे मान्य नसून, सरसकट तीन हजार रुपये दराने कांदा खरेदी करावा; अन्यथा सर्वांना बरोबर घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला.



























































