हिंदुस्थानचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आपल्यामध्ये 1999मध्ये झालेल्या कराराचे पाकिस्तानने तेव्हा उल्लंघन केले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज दिली. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये केलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात शरीफ यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.
शरीफ आणि वाजपेयी यांच्यात 21 फेब्रुवारी 1999 रोजी लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षऱया झाल्या होत्या. मात्र थोडय़ाच महिन्यांनी पाकिस्तानने कारगिल भागात घुसखोरी केल्यानंतर कारगिल संघर्षाला तोंड फुटले होते.
28 मे 1998 रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर वाजपेयी इथे आले आणि त्यांनी आमच्याशी करार केला. पण आम्ही त्या कराराचे उल्लंघन केले. ही आमची चूक होती, असे शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या बैठकीत सांगितले.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचण्या करण्यापासून रोखण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, पण मी ती नाकारली. जर इम्रान खान माझ्या जागेवर असते तर त्यांनी क्लिंटन यांची ऑफर स्वीकारली असती, असा दावा शरीफ यांनी केला.
लाहोर घोषणापत्र काय होते…
शरीफ आणि वाजपेयी यांनी 21 फेब्रुवारी 1999 रोजी ऐतिहासिक शिखर परिषदेनंतर लाहोर घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमधील शांतता आणि स्थैर्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोनातून बोलणाऱया या कराराने एका मोठय़ा प्रगतीचे संकेत दिले होते. परंतु काही महिन्यांनंतर जम्मू-कश्मीरमधील कारगिल जिह्यात पाकिस्तानी घुसखोरीमुळे कारगिल युद्ध सुरू झाले.