पुण्यात चार अल्पवयीन मुलींना नेले पळवून, तर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात शहरातील विविध भागात राहणार्‍या चार अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. भवानी पेठ, हिंगणेखुर्द, औंध, वारजे माळवाडीमधून मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. सर्व अपहरणाच्या घटना आठवड्याभरात  घडल्या आहेत. त्यानुसार संबंधित मुलींच्या पालकांनी हद्दीतील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तसेच एका 26 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे.

भवानीपेठेतील 17 वर्षीय  अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेण्यात आले आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी खडक पोलिस ठाण्यत तक्रार दाखल केली आहे. दुसर्‍या घटनेत हिंगणे खुर्द परिसरातून 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पीडितेच्या आईने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्याशिवाय औंधमधून  17 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.  लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. तर हडपसर परिसरातून 15 वर्षीय मुलाला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले आहे. दरम्यान, अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती संबंधित पोलिसांनी दिली आहे.

लग्नाच्या आमिषाने तरूणीवर अत्याचार

लग्न करण्याच्या आमिषाने 26 वर्षीय तरूणीवर मित्राने अत्याचार केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रोहित साठे या तरुणाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तरूणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिच्याकडून 90 हजार रूपये घेउन, अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.