
सामना प्रतिनिधी । उल्हासनगर
कोणाला कोणता छंद लागेल याचा काही नेम नाही. उल्हासनगरातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना चक्क दुचाकी गाडय़ा चोरण्याचा छंद लागला. स्कूटी दिसली की ती घेऊन धूम ठोकायची आणि मनसोक्त चालवायची. पेट्रोल संपले की दुचाकी आहे त्याच ठिकाणी सोडून पळून जायचे आणि पुन्हा दुसऱ्या दुचाकीच्या शोधात फिरायचे. अशा या अजब-गजब चार चोरटय़ांचा छडा पोलिसांनी लावला असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, तर सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
उल्हासनगरात गाडय़ा चोरण्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र या ‘उद्योगा’त आता शाळेतील अल्पवयीन मुलेही असल्याचे आढळून आल्याने शैक्षणिक वर्तृळात तो चिंतेचा विषय बनला आहे. श्रीराम चौकातील मातोश्री हॉस्पिटलजवळील होंडा कंपनीची काळ्या रंगाची ऑक्टिव्हा अज्ञात चोरट्य़ांनी चोरून नेल्याचा गुन्हा दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे सात गुन्हे दुचाकी चोरीचे दाखल झाल्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी गंभीर दखल घेतली. गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय अहिरे, उपनिरीक्षक उमेश काळे, पोलीस हवालदार जालिंदर राठोड, पोलीस नाईक राहुल काळे, शिपाई वैजनाथ राख, तानाजी शेलार यांनी छडा लावून चार शाळकरी मुलांना ताब्यात घेतले.
… आणि कबुली दिली
या मुलांची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन, हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या भागात एक अशा एकूण सात दुचाकी जप्त केल्या.



























































