महाराष्ट्र पुन्हा हादरला – जळगावमध्येही ‘हिट ऍण्ड रन’चे चार बळी

पुण्यात बडय़ा बापाच्या मस्तवाल मुलाने भरधाव कार चालवून दोन जणांचा बळी घेतला असताना आता जळगावमध्येही ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात चार जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तब्बल 15 दिवसांनंतर हे प्रकरण उजेडात आले याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. हे प्रकरणही दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत मोठय़ा प्रमाणात आवाज उठवला गेल्याने पोलिसांनी याप्रकरणी आता मुंबईतून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पुण्यात भरधाव पोर्शे कार चालवून मस्तवाल मुलाने दोघांचा बळी घेतला. मात्र यामध्ये मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या बिल्डर वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा खटला सुरू आहे. असे असताना आता जळगावमध्येही असेच प्रकरण घडल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र हादरला आहे. कारची रेस लावल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. या ‘हिट अँड रन’ प्रकरणात एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी गेला होता. त्यामुळे या प्रकरणात तातडीने आरोपींना पकडून कारवाई होणे गरजेचे असताना पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत होता. पुण्याच्या प्रकरणामुळे हे प्रकरणही उजेडात आले असून पोलिसांनी वाढत्या सामाजिक दबावामुळे कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात आरोपींनी गांजा पिऊन गाडी चालवली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आरोपीला स्थानिकांकडून बेदम चोप

z जळगावच्या रामदेववाडी येथील अपघात प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एस. सी. मनोरे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेत अर्णव अभिषेक कौल हा कार चालवत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
z दरम्यान, भरधाव कारमुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे स्थानिकांनी आरोपींना बेदम चोप दिला होता. यामध्ये जबर जखमी झाल्यामुळे सुरुवातीला त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. यामध्ये पोलिसांनी आरोपी अक्षय कौल आणि अखिलेश पवार यांना मुंबई रुग्णालयातून ताब्यात घेतले आहे.