
जुन्या भांडणासह उधारीच्या पैशांवरुन झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली आहे. शुभम अशोक गायकवाड (वय 23) , अभिजीत उर्फ नाना सुखराज महाले (वय 23), हेमंत किसन मोरे (वय 31) आणि गोविंद बाबासाहेब बनसोडे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विकास लक्ष्मण सोनवणे ( वय 32, रा. मांजरी खु.,ता. हवेली ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मांजरी स्मशानभूमी परिसरात तरूणाची हत्या खून करून आरोपी मोटारीतून केसनंद गावच्या दिशेने गेल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट सहामधील पोलीस शिपाई ऋषीकेश ताकवणे आणि ऋषीकेश व्यवहारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींच्या मोटारीचा पाठलाग करत त्यांना लोणीकंद परिसरात पकडले. चौकशीत त्यांनी जुन्या भांडणाच्या आणि उसन्या पैशांच्या वादातून विकास सोनवणे याचा खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक गणेश माने, एपीआय नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, सलीम तांबोळी यांनी केली.



























































