
अकोल्यातील अवघ्या पावणेचार वर्षांच्या वैदिशा शेरेकर या चिमुकलीने थक्क करणारी कामगिरी केली आहे. वैदिशा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईतर्फे घेण्यात आलेली प्रारंभिक परीक्षा नुकतीच प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. यापूर्वीही वैदिशाने वयाच्या अडीच वर्षांत सर्व देशांच्या राजधानी आणि त्यांचे राष्ट्रध्वज अचूक ओळखण्याचा विक्रम केलेला आहे. त्यावेळी तिच्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांनी घेतली आहे.
वैदिशा एकीकडे असाधारण बुद्धिमत्तेची झलक दाखवत असताना गाण्याकडे वळली. वैदिशाचे वडील वैभव शेरेकर बँकेत अधिकारी तर आई दीपाली शेरेकर गृहिणी आहेत. लेकीने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची परीक्षा द्यावी, असे त्यांना वाटले. त्यांनी परीक्षेसाठी तिचा ऑनलाइन अर्ज भरला. मात्र, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांनी वैदिशाच्या वडिलांशी संपर्क करून तिचे वय खूप कमी असल्यामुळे दोन ते तीन वर्षानंतर तिला परीक्षेला बसवा असे सुचवले. मात्र पालकांनी वैदिशाच्या यापूर्वीच्या विक्रमांची माहिती मंडळाला देत परीक्षेची संधी द्यावी, अशी विनवणी केली. सत्राच्या शेवटी मुंबई येथील चमूने परीक्षा घेतली. वैदिशाने प्रत्येक प्रश्नांची अचूक उत्तरे देत सर्वांना अचंबित करून टाकले व प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केली.

























































