
जगभरात दहशत पसरविणाऱया कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने कर्नाटक- पाठोपाठ आता महाराष्ट्रात शिरकाव केला असून डोंबिवलीतील 33 वर्षीय तरुणाला संसर्ग झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. हा तरुण दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि दिल्लीमार्गे आला होता. तसेच गुजरातच्या जामनगर येथेही 72 वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. दरम्यान, 50 पेक्षा अधिक मल्टिपल व्हेरिएंटची क्षमता असणाऱया घातक ओमायक्रॉनने हळूहळू हात-पाय पसरण्यास देशात सुरुवात केली असून टेन्शन वाढले आहे. आतापर्यंत देशात चार रुग्ण आढळले आहेत. यामुळे विदेशातून येणाऱया सर्व प्रवाशांची विमानतळांवर कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
ओमायक्रोन महाराष्ट्रात कसा आला?
- हा तरुण 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला.
- त्याने कोणतीही कोरोना लस घेतली नव्हती.
- डोंबिवली येथील कोविड सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
- 24 नोव्हेंबरलाच त्याच्यामध्ये सौम्य तापाचे लक्षण आढळले.
- त्याच्या संपर्कात आलेले 60 जण कोविड निगेटिव्ह आढळले.
गुजरातमध्येही एकाला बाधा, 24 तासांत 3839 प्रवाशांची विमानतळावर चाचणी
गेल्या 24 तासांत मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दक्षिण आफ्रिका आणि इतर आफ्रिकन देशातून आलेल्या 3839 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तसेच इतर देशांतून आलेल्या 17107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली.1 डिसेंबरपासून विमानतळावर आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
झिम्बाब्वेहून सासरवाडीला आला होता
गुजरातच्या जामनगर येथे 72 वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. अनिवासी हिंदुस्थानी असलेली ही व्यक्ती झिम्बाब्वे येथून जामनगरला 28 नोव्हेंबरला आली. जामनगरला त्यांची सासरवाडी आहे. श्वासोच्छवासाचा त्रास आणि ताप आल्यामुळे 2 डिसेंबरला कोरोना चाचणी केली गेली. त्याचे सॅम्पल जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.
कोरोनाही वाढतोय, सहा राज्यांना केंद्राचा ऍलर्ट
एकीकडे ओमायक्रोनचे संकट असतानाच कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे देशातील सहा राज्यांना पेंद्राने अॅलर्ट दिला आहे. त्यात केरळ, जम्मू-कश्मीर, तामीळनाडू, ओडिशा, कर्नाटक आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
बिटकॉईन 10 हजार डॉलर्सने घसरला
ओमायक्रोनचा क्रिप्टोकरन्सीला जबरदस्त फटका बसला आहे. क्रिप्टोकरन्सीच्या किमती कधी नव्हे इतक्या खाली घसरल्या. जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱया ‘बिटका@ईन’चा भाव 20 टक्क्यांनी खाली आला. अवघ्या तासाभरात बिटका@ईनचा भाव 10 हजार डॉलर्स म्हणजेच 7 लाख रुपयांपेक्षा जास्त खाली आला. इतर क्रिप्टोकरन्सींमध्येही घसरण दिसून आली.































































