झाड अंगावर पडून तीन आठवडय़ांत चौथा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड येथे आज झाडाची फांदी अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तीन वर्षीय मुलासह एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. यामुळे मुंबईत या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या तीन आठवडय़ांत झाड अंगावर पडून होणाऱया मृतांची संख्या चार झाली आहे. त्यामुळे पाऊस आणि जोरदार वारा वाहत असताना झाडांखाली थांबू नका, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

मालाड पूर्व बच्चानी नगर, दफ्तरी रोड येथे खासगी जागेतील हे जांभळाचे झाड होते. आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास या झाडाची मोठी फांदी दोन महिला आणि एका मुलाच्या अंगावर कोसळली. यामध्ये एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेमधील जखमींना जवळच्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी चिदाबाई अहिरे या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्या असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.