
सामना ऑनलाईन । कझान
रशियातील फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये शनिवारी फ्रेंच क्रांती दिसली. जगभरातील तमाम फुटबॉलप्रेमींच्या नजरा खिळून राहिलेल्या माजी जगज्जेत्यांच्या लढतीत फ्रान्सने लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला ४-३ अशा फरकाने हरवले आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या पराभवासह अर्जेंटिनाचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. लिओनेल मेस्सीचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग पावले. या लढतीत उभय संघांनी सात गोल मारले.
फ्रान्स व अर्जेंटिना यांच्यामधील बाद फेरीच्या लढतीत पूर्वार्धात १-१ अशी बरोबरी झाली. ऍण्टोन ग्रिझमॅनने १३ व्या मिनिटाला स्पॉट किकवर (पेनल्टी) गोल केल्यानंतर अर्जेंटिनाकडून अँजेल डी मारियाने ४१ व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला.
अकरा मिनिटांत बकरा
अर्जेंटिनाकडे आघाडी असताना बेंजामीन पॅवार्डने ५७ व्या मिनिटाला आणि किलीयन म्बापे याने ६४ व ६८ व्या मिनिटाला गोल करीत फ्रान्सला ४-२ अशा फरकाने पुढे नेले. फ्रान्सने अकरा मिनिटांच्या अंतरात तीन गोल केले आणि सामन्याला कलाटणी मिळाली.

























































