दोन वर्षांत 14 वेळा बलात्कार, केरळच्या नन बलात्कार प्रकरणाचा आज निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ येथील नन बलात्कार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी शुक्रवारी निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण 2018मधील असून या प्रकरणात एका बिशपवर आरोप करण्यात आला आहे.

28 जून 2018 मध्ये 43 वर्षांच्या ननने कोट्टायममध्ये पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. बलात्कार पीडित महिला पंजाब स्थित ‘मिशनरी ऑफ जिजस मंडळा’ची सदस्य आहे. फ्रँको हा जालंधर येथील एका चर्चचा माजी पाद्री आहे. ननने केलेल्या आरोपांनुसार, 2014मध्ये हिमाचल प्रदेशच्या एका गेस्ट हाऊसमध्ये फ्रँकोने तिच्यावर बलात्कार केला होता. दोन वर्षांमध्ये त्याने 14 वेळा तिच्यावर बलात्कार केला.

2015 ते 2017मध्ये फ्रँकोने पीडितेसोबत चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल या मार्फत संभाषण केलं होतं. तिला बिशपची भीती वाटत असल्याने ती दोन वर्षं गप्प होती. मात्र, नंतर तिने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली होती.

ननच्या तक्रारीवरून फ्रँकोला सप्टेंबर 2018मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात 2019मध्ये आरोपपत्र दाखल केलं गेलं. ही तक्रार रद्द व्हावी यासाठी फ्रँकोने केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तक्रार रद्द करण्यास दोन्ही न्यायालयांनी नकार दिला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण करण्यात आली.

या खटल्यात एकूण 83 साक्षीदार आणि 30 हून अधिक पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून शुक्रवारी न्यायाधीश जी. गोपाकुमार हे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.