
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
3 ते 4 टक्के जादा रक्कमेचे आमिष दाखवून विहित मुदतीत पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अर्जुन गजानन सावंत ( 40 ), वैदही अर्जुन सावंत ( 32 ) रा. भांडुप (मुंबई) या दोघांना जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश कदम यांनी 26 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात शिवदत्त आत्माराम सावंत ( 48 ) रा. वेंगुर्ले भटवाडी यांना न्यायालयाने शनिवारी 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावालेली होती. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्निल सावंत यांनी काम पाहिले.
अँरोज डायनामिक एटरप्राईज नावाची कंपनी स्थापन करून महिन्याला 3 ते 4 टक्के जादा रक्कम देण्याचे आमिष दाखवून सशयितांनी धनादेश व रोख रक्कम स्वीकारली होती. त्याचे करारपत्र तयार करून त्या रक्कमेचे आगावू धनादेश दिले होते. मात्र, त्याची मुदत संपली तरी रक्कम परत न केल्याने नेरूर कलमेवाडी येथील कृष्णा सदाशिव मदने यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार सशयितांवर भादवी कलम 406, 420, 34 व महाराष्ट्र ठेविदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3, 4 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील शिवदत्त सावंत यांना आधीच अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर अर्जुन व वैदही सावंत या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. 4 एप्रिल 2013 ते 10 जानेवारी 2015 या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. 2 लाख 26 हजार रुपयांची ही फसवणूक असून 17 ऑक्टोबर 2018 रोजी याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीचा प्रोप्रायटर अर्जुन सावंत असून तोच मुख्य सूत्रधार आहे. वैदही सावंत पार्टनर आहे. न्यायालयात वैदही हिचा या प्रकरणात प्रत्येक्ष संबंध नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. मात्र, अशाचप्रकारच्या गुह्यात पुणे चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याचे सरकारी वकील सावंत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे न्यायाधीश कदम यांनी या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली. पुणे येथील फसवणुकीत तिसरा संशयित शिवदत्त सावंत याचा संबंध नव्हता.
































































