प्रसिद्ध मिठाई दुकानाचे बनावट संकेतस्थळ बनवून फसवाफसवी,  झोलर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाच्या नावे बनावट संकेतस्थळ बनवून त्याआधारे ग्राहकांची पद्धतशीर लाखो रूपयांची आर्थिक फसवणूक करणार्‍या गुन्ह्यातील म्होरक्याला गावदेवी पोलिसांनी पकडले. आग्रा येथे त्याच्या मुसक्या आवळल्या नंतर मिठाईच्या नावे त्याने केलेल्या फसवणूकीचे आठ गुन्हे उघडकिस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

प्रसिद्ध मिठाईच्या दुकानाची बनावट संकेतस्थळ बनवून ऑर्डर केलेली मिठाई घरपोच देऊ अशी बतावणी करत सायबर भामटे नागरिकांची आर्थिक लुटमार करीत होते. अशाप्रकारचे आठ गुन्हे गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत उपायुक्त मोहितकुमार गर्ग, एसीपी रवी सरदेसाई, वरिष्ठ निरीक्षक विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास शिंदे व पथकाने तपास सुरु केला. मिठाईच्या दुकानाच्या नावे बनावट संकेतस्थळ राहूल डोगरा या भामट्याने तयार केल्याचे शिंदे यांनी शोधून काढले. पण त्याचा ठावठिकाणा काही सापडत नव्हता. तो सतत ठिकाणं बदलून राहत होता. पोलिसांनी त्याच्या हालचालीवरती तांत्रिक पद्धतीने पाळत ठेवली होती. अखेर तो आग्रा येथे असल्याचे समजताच तेथे जाऊन त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. झटपट पैसा कमविण्यासाठी आम्हीच प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या नावे बनावट संकेतस्थळ बनवून लोकांची फसवणूक करीत असल्याची कबूली राहूलने दिली. ग्राहकांनी संकेतस्थळ शोधल्यानंतर खरे संकेतस्थळ दिसण्याआधी आपले बनावट संकेतस्थळ दिसण्याकरिता त्या भामट्याने सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनचा वापर केला होता. बनावट संकेतस्थळ बनविणारा म्होरक्याच हाती लागल्याने त्याने केलेले ऑनलाईन फसवणूकीचे आठ गुन्हे उघडकिस आले आहे.ग्राहकाने संकेतस्थळ उघडून तेथे नमूद व्हॉट्सअपद्वारे मिठाईची ऑर्डर केल्यावर हे भामटे पैसे पाठविण्यासाठी त्यांचा स्कॅन पाठवायचे मग त्यामाध्यमातून शिताफिने ग्राहकांची बँक डिटेल घेऊन त्याची आर्थिक फसवणूक करीत होते.