वीज बिलाच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज बिल अपडेटच्या नावाखाली महिला डॉक्टरची आणि हाऊस किपिंगची सुविधा पुरवणाऱया महिलेची फसवणूक झाली आहे. फसवणूकप्रकरणी भांडुप आणि विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

तक्रारदार या डॉक्टर असून त्या भांडुप परिसरात राहतात. गुरुवारी तक्रारदार या क्लिनिकमध्ये असतानाच त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. जर बिल अपडेट केले नाही तर वीजपुरवठा बंद केला जाईल, असे त्या मेसेजमध्ये नमूद होते. त्यावर विश्वास ठेवून महिलेने ऑनलाइन पद्धतीने 10 रुपये भरण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रारदार यांना पैसे भरता आले नाही. ठगाने महिलेला रिचार्ज क्यूब या वेबसाइटवर जाऊन पैसे भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन महिलेने ती लिंक ओपन केली. लिंक ओपन करताच महिलेच्या खात्यातून 1 लाख 44 हजार रुपये काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर विलेपार्ले येथे देखील अशाच प्रकारे महिलेची फसवणूक झाली आहे. ठगाने वीज बिल अपडेटच्या नावाखाली महिलेच्या खात्यातून दोन लाख रुपये काढले आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.