क्रेडिट कार्ड व गृहकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने घातला गंडा, सात जणांची टोळी जेरबंद

एका गरजवंताला बँकांकडून क्रेडिट कार्ड व गृहकर्ज मिळवून देऊ असे सांगत आरोपींनी त्याच्या नावाने बनावट विविध कागदपत्रे बनवली. मग त्या कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून क्रेडिट कार्ड मिळवली व त्या मोबदल्यात साडेतील लाख आरोपींनी घेतले. तर गृहकर्जाच्या नावाने जवळपास एक लाख रुपये घेतले आणि त्या व्यक्तीची फसवणूक करणाऱया सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने गजाआड केले.

सोमदत्त (नाव बदललेले) यांना पैशांची नितांत आवश्यकता होती. तेव्हा प्रदीप मौर्या (47) या भामटय़ाने सोमदत यांना क्रेडिट कार्ड व गृहकर्ज मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर प्रदीप, अब्दुल शेख (44), जगदीश जामसंडेकर (53), कादर परमार (48) व तीन महिलांनी संगनमत करून एक कट रचला. त्यानुसार या टोळीने सोमदत्तला बँकांचे क्रेडिट कार्ड व गृहकर्ज मिळवून देऊ अशी हमी दिली. त्यानंतर आरोपींनी सोमदत्तच्या नावाने बनावट आय.टी रिर्टन्स, गुमास्ता परवाना, व्यवसाय उदम प्रमाणपत्र आदी कागदपत्रे बनवली. मग ती कागदपत्रे बँकांमध्ये सादर करून त्याआधारे क्रेडिट कार्ड मिळवले.

क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्या मोबदल्यात आरोपींनी सोमदत्तकडून तीन लाख 50 हजार रुपये घेतले. आणि गृहकर्ज मिळवून देतो असे सांगून एक लाख रुपये घेतले, मात्र प्रत्यक्षात आरोपींनी सोमदत्तच्या आधारकार्ड व पॅनकार्डचा गैरवापर करून फसवेगिरी केली. हा प्रकार लक्षात येताच सोमदत्तने आग्रीपाडा पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-3ने या गुह्याचा समांतर तपास सुरू केला. प्रभारी निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कसून तपास करीत सातही आरोपींना पकडले.