ना घडय़ाळ, ना मोबाईल, फ्रान्समधील अंधाऱया गुहेत त्यांनी घालवले 40 दिवस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्हाला जर कुणी महिनाभर अंधाऱया गुहेत ठेवलं तर… मुळात ही कल्पनाच करणे अवघड आहे. परंतु प्रान्समध्ये असं खरोखर घडलंय. येथील लोम्ब्रिव्ह गुहेत 15 लोकांना तब्बल 40 दिवस ठेवलं होतं. आता या लोकांनी असं काय केलं की त्यांना गुहेत राहण्याची शिक्षा मिळाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. खरंतर हा डीप टाईम या वैज्ञानिक प्रयोगाचा भाग होता.

प्रयोगादरम्यान या 15 वॉलेंटियर्सचा बाहेरच्या जगाशी कोणताही संबध राहू नये याकरता त्यांना मोबाईल, घडय़ाळ, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स या वस्तूदेखील दिल्या नव्हत्या. यादरम्यान झोपणे, उठणे, जेवण करणे आदी क्रियांसाठी वॉलेंटियर्स बायलॉजिकल घडय़ाळाची मदत घेत होते.

डीप टाईम प्रयोगात 27 ते 50 वयोगटातील आठ पुरुष आणि सात महिलांचा समावेश होता. नुकताच हा प्रयोग पूर्ण झाला असून 22 एप्रिलला ही टीम गुहेतून बाहेर आली आहे. इतके दिवस अंधारात राहून आल्यानंतर बाहेरच्या उजेडामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ नये याकरता त्यांना गॉगल्स दिले होते. प्रयोगादरम्यान सेंसर्सच्या मदतीने त्यांची दिनचर्या, राहणीमान, वागणूक आदी गोष्टींचा अभ्यास केला.

डीप टाईम प्रयोगासाठी प्रान्स आणि स्वित्झर्लंडचे वैज्ञानिक एकत्र आले होते. मानवाच्या शरिरातील बदलांचा अभ्यास करणे हा प्रयोगाचा हेतू होता. त्यामुळे 40 दिवस अंधाऱया गुहेत राहिल्यावर त्यांच्या शरीरात काय बदल जाणवतात याचा अभ्यास करण्यात आला. परंतु बाहेर आल्यावर आपण 40 दिवस गुहेत राहिलोय हे समजल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.