फ्रेंच ओपनही आपलेच, सात्त्विक-चिरागची सुस्साट कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनच्या फ्रेंच ओपनलाही आपलेच केले. त्यांनी पोर्ते दे ला चॅपल एरिनात चायनीज तैपेईच्या ली झी हुई आणि यांग पो सुआन जोडीचा पराभव करत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे दुसऱयांदा ऐतिहासिक जेतेपद संपादले. 2022 साली फ्रेंच ओपनमध्ये बाजी मारण्यापूर्वी 2019 च्या स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या जोडीचे हे या हंगामातील पहिले जेतेपद ठरले आहे.

आशियाई स्पर्धेत सोनेरी कामगिरी करणाऱया चायनीज तैपेईच्या हुई-सुआन जोडीचा हिंदुस्थानी एक्सप्रेसने 21-11 आणि 21-17 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या वर्षी सात्त्विक-चिरागला मलेशिया सुपर 1000 आणि इंडिया सुपर 750 या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर गेल्याच महिन्यात झालेल्या चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेतही त्यांना उपविजेतेपदच जिंकता आले होते. अखेर या जोडीने हंगामातील पहिले यश संपादत जेतेपदाचे खाते उघडले.