
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी कुस्तीपटू रवी दहियाला चुरशीच्या उपांत्य लढतीत प्रतिस्पर्धी कझाकिस्तानच्या नूरइस्लाम सनायेव याने चावा घेतला होता. त्याच्या या अखिलाडूपणावर क्रीडा विश्वातून टीकेची झोड उडाली. मात्र अखेर नूरइस्लामला उपरती झाली असून त्याने ‘मित्रा, मला माफ कर,’ असे म्हणत रवी दहियाची माफी मागितली आहे.
रवी दहियाने 57 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नूरइस्लाम सनायेव याला चितपट करून अंतिम फेरी गाठली होती. ही कुस्ती अतिशय अटीतटीची झाली. नुरईल्सामकडे या लढतीत मोठी आघाडी होती. मात्र रवी दहियाने अखेरचा अर्धा मिनीट शिल्लक असताना नूरइस्लामला चितपट केले. मात्र ज्या वेळी रवी दहिया प्रतिस्पर्धी मल्लाचे दोन्ही खांदे आखाडय़ाला टेकवण्याचा प्रयत्न करीत होता त्या वेळी नूरइस्लाम रवीच्या दंडाला चावा घेत होता. रवीने तो त्रास सहन करून नूरइस्लामला चितपट केले. कुस्ती संपल्यानंतर रवीने पंचांना नूरइस्लामने चावा घेतल्याचे व्रण दाखवले. सोशल मीडियावर रवीच्या दंडाचा लचका तोडतानाचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे कझाकिस्तानच्या नूरइस्लामसनायेव याच्या या अखिलाडू वृत्तीबद्दल क्रीडाप्रेमींनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला, तर रडीचा डाव खेळल्याबद्दल त्याची खिल्लीही उडवली.
‘‘कुस्तीच्या आखाडय़ाला भाडणं आणि मारहाण हे प्रकार नवे नाहीत. त्यामुळे नूरइस्लामने मला चावा घेतल्याची गोष्ट त्यापुढे फारच छोटी आहे. लढतीनंतर मी ही गोष्ट विसरून गेलो होतो. मात्र त्याने चावा घेतलेली माझ्या दंडाची जागा अजूनही दुखतेय. तरीही नूरइस्लामबद्दल माझ्या मनात अजिबाद राग नाही.’’
– रवी दहिया





























































