मित्राला खाडीत ढकलले, बोंबाबोंब केली पडल्याची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

दारू पिण्यासाठी पैसे मागूनही देत नाही, म्हणून दारूच्या नशेत तर्रर असलेल्या मित्राला वाशी पुलावरून खाडीत फेकणाऱया तिघांना गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. राजूने पुलावरून उडी टाकली अशी बोंब करून आरोपींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पण सत्य समोर आले आणि तेच गजाआड झाले.

2 डिसेंबरच्या रात्री राजू गायकवाड (35) याने वाशी पुलावरून खाडीत उडी मारल्याची माहिती त्याचा मित्र अविनाश ढिलपे याने राजूचा भाऊ विजयला दिली. त्यामुळे विजयच्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात राजू हरवल्याची तक्रार नोंद करून त्याचा तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, त्या रात्री राजूसोबत कृष्णा सुतार, अविनाश ढिलपे व 16 वर्षांचा मुलगा होता असे विजयला समजले. तसेच हे तिघे काही तरी लपवत असल्याचा संशय आल्यामुळे विजयने वाशी पोलिसांना तशी पुन्हा तक्रार दिली.

त्यामुळे वाशी पोलिसांनी कलम 365, 34 अन्वये गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी गोवंडी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर एसीपी जे. डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास धायगुडे, उपनिरीक्षक विकास जाधव व पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कृष्णा, अविनाश व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा चोरीच्या उद्देशाने आम्हीच राजूला वाशी पुलावरून खाडीत फेकल्याची कबुली दिली.

दारू पाजून खाडी पुलावर नेले
राजू आणि तिघे आरोपी गोवंडी येथे दारू प्यायले. तेव्हा आरोपींनी आणखी दारू पिण्यासाठी राजूकडे पैसे मागितले. पण राजूने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या तिघांनी राजूला धक्काबुक्की करीत त्याच्या कानातली सोन्याची बाळी हिसकावली. त्यामुळे तुमची पोलिसात तक्रार देतो असे राजू म्हणाला. त्यानंतर आरोपी राजूला स्कुटीवर बसवून खाडीपुलावर घेऊन गेले. तेथे राजूची सोन्याची चेन हिसकावून घेण्यात आली. मग राजू आपली पोलिसात तक्रार करेल या भीतीने आम्ही राजूला पुलावरून खाडीत फेकल्याची आरोपींनी कबुली दिल्याचे गोवंडी पोलिसांनी सांगितले.