
खरं तर आपण रोज नव्याने आयुष्य सुरू करू शकतो. कोणत्याही क्षणी नवीन कार्याची, दिनचर्येची, कामाची सुरुवात करू शकतो. फक्त त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारशैली आवश्यक असते.
स्त्री गृहिणी असो, नोकरदार असो वा व्यावसायिक काम करणारी असो, स्त्री ही स्वतःच्या संसारासाठी, नवऱयासाठी, मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी, वडीलधाऱयांची सेवा करण्यासाठी सतत खपत असते. घरातील लोकांच्या आवडीनिवडी सांभाळताना महिला स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. स्वतःची तब्येत, खाणे-पिणे, हिंडणे, फिरणे, मैत्रिणींना भेटणे, स्वतःचे छंद, कला जोपासणे, पुरेसा आराम करणे, पथ्य पाणी याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. इतरांची मर्जी सांभाळताना स्वतःला विसरून गेलेल्या असतात. अनेक वेळा काही महिला या मी सुंदर दिसत नाही असा न्यूनगंड बाळगतात आणि मग बाहेर निघताना किंवा कोणाकडे जाताना थोडय़ा हिरमुसल्यासारख्याच असतात.
खरं तर स्वतःच्या दिसण्यामुळे, स्वतःला अपडेट ठेवल्यामुळे आपला आत्मविश्वास नेहमीच वाढत असतो. तुम्ही स्वतःला इतरांसमोर प्रेझेंट कसे करताय हे महत्त्वाचं असतं. आपलं वय वाढत असताना त्याचा न्यूनगंड न बाळगता आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू न देता, प्रत्येक महिलेने स्वतःसाठी थोडा तरी वेळ राखून ठेवलाच पाहिजे.
स्वतः स्वतःवर प्रेम करायला शिका. तुम्ही जे आहात तसे चांगले आहात. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका. आपले जीवन आपल्या अटींवर जगा. स्वतःसाठी काहीतरी निरोगी आणि चवदार पौष्टिक बनवून खा. रोज व्यायाम, योगासने यांना प्राधान्य द्या. जसा जमेल तसा योगा आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की, ज्या तुम्ही घरच्या घरी स्वतःची काळजी घेऊन स्वतःचं व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवू शकता. आपली सकाळ होते आणि मग ब्रश केल्यानंतर आपण कामाला लागतो. अनेक वेळा ब्रश करतानादेखील महिलांची घाई असते आणि असं न करता तुम्ही ब्रश करण्यासाठी पाचएक मिनिटं स्वतःला देणं अत्यंत गरजेचं असतं. सकाळी उठल्या उठल्या दात स्वच्छ घासून आंघोळ करून तुम्ही हातापायांना बॉडी लोशन, मॉइश्चरायझर लावू शकता. एलोवेरा जेल लावू शकता. तेही तुम्हाला शक्य नसेल तर अगदी तुम्ही खोबरेल तेलाने दोन मिनिटं जर मसाज केलात तर ते त्यानेही तुमची स्किन चांगली हायड्रेट होऊ शकते. यानंतर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढून नाश्ता करायचा असतो, पण याकडे अनेक वेळा महिला दुर्लक्ष करतात. नवऱयासाठी टिफिन तयार करतील, मुलांसाठी टिफिन तयार करतील, पण स्वतःला एक घास घ्यायलाही त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा वेळेस जर तुम्ही ड्रायफ्रूट्स खाणं सुरू केलं, ते ड्रायफ्रूट जर तुम्ही रात्री भिजवून ठेवले आणि मग खाल्ले तर तेही तुमच्या शरीरासाठी जास्त चांगले आहेत. त्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर घरी केलेला नाश्ता तुम्ही खाऊ शकता. कडक डाएट न करता प्रत्येकीने सात्विक जेवण घेणं महत्त्वाचं असतं. अशामुळे तुमच्याबरोबरच कुटुंबाचे आयुष्यही हेल्दी राहील.
कोणत्याही वयात स्त्री आत्मविश्वासाने भरारी घेऊ शकते. फक्त तिने न डगमगता सदैव आपल्या मनाला, विचारांना सकारात्मक आणि ताजेतवाने ठेवणे महत्त्वाचे असते.
तयार राहा
ड्रेसिंग सेन्स तुमच्या व्यक्तिमत्त्वात घर घालून तुमचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बाहेर निघताना आपल्या रंगाचे फाऊंडेशन किंवा पावडर लावणे हे काही चुकीचं ठरत नाही. अनेक वेळा काहींना लिपस्टिक लावली तर ते फार ऑड वाटतं. अशा वेळेस तुम्ही अगदी न्यूड रंगाची लिपस्टिक लावू शकता. डोळय़ात थोडसं काजळ घातल्यामुळे किंवा आयलाइनर, मस्काराचा वापर केल्यामुळे तुमच्या डोळय़ांचे सौंदर्य खुलून दिसेल. तसेच आत्मविश्वासासाठी तुम्ही संवाद कौशल्य व तुमच्या देहबोलीकडे लक्ष दिले पाहिजे. चुकांच्या भीतीने महिला नवीन काहीतरी करणे नेहमी टाळत असतात, पण अशामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. टीकांचा खंबीरपणे सामना करून नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमीच तयार राहायला पाहिजे.
शिवानी गोंडाळ
(मेकअप आर्टिस्ट)
[email protected]



























































