मैत्रिणीने लावले गांजाचे व्यसन, प्रियकराने घेतला संशय! त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैत्रिणीला जीवन उध्वस्त करण्याची धमकी देत तिला अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडले. तर प्रियकराने संशय घेऊन तिला इतर मित्र-मैत्रिणींसोबत मारहाण केल्यामुळे महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मैत्रीण तसेच मित्राच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हरलीन कौर (वय 21, रा. विमाननगर, रा. अमृतसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी हरलीनचा मित्र साईराज आणि मैत्रीण उत्कर्षा ससाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हरलीनच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हरलीन हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने 1 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कौर कुटुंबीय धार्मिक विधीसाठी अमृतसरला गेले होते. अमृतसरहून कौर कुटुंबीय पुण्यात परतले. त्यानंतर हरलीनच्या आईन तिची वही, पुस्तक उघडून पाहिले. तेव्हा तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

मैत्रिणी उत्कर्षाने सिगारेट आणि गांजा ओढण्याची सवय लावली. मित्र साईराज दुसर्‍या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशायवरून मारहाण करीत होता. त्याने मोबाइल घेऊन सर्वासमक्ष मारहाण केल्याचे हरलीनने चिठ्ठीत लिहिले होते. त्यानंतर हरलीनच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाठक तपास करत आहेत.