
अकरावी प्रवेशासाठी 100 गुणांची ऑफलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या सीईटीसंदर्भातील जीआर गुरुवारी जारी केला. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे.
दहावीचा निकाल 15 जुलैच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता असल्याने ही सीईटी परीक्षा जुलैच्या अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात घेतली जाणार आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरांतील नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश हे सीईटीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावरच ठरवले जाणार आहेत.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
ही सीईटी परीक्षा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती स्थापन केली आहे. यामध्ये राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सदस्य व बालभारतीचे सदस्य असतील, तर आयुक्त परीक्षा परिषदेचे संचालक हे सदस्य सचिव आहेत.
सीईटी द्यायची नसेल तर…
ज्या विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची नाही अशा विद्यार्थ्यांना सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.
सीईटी परीक्षा राज्य शिक्षण मंडळासोबतच सीबीएसई, आयसीएसई आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी द्यावी लागणार आहे.
ही परीक्षा पूर्णतः ऐच्छिक आहे. दहावीच्या एकूण अभ्यासक्रमावर आधारित सीईटी होणार आहे.
इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रs या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांची परीक्षा असेल.
परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे आणि ओएमआर पद्धतीचे असणार आहे.
विद्यार्थ्यांना 100 गुणांची एक प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल. या परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य शिक्षण मंडळ आणि परीक्षा परिषदेमार्फत घोषित केली जाणार आहे.


























































