अकरावी प्रवेश विशेष फेरीचा कटऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीपेक्षा जास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या बुधवारी जाहीर झालेल्या विशेष प्रवेश फेरीचा कटऑफ हा सर्वसाधारण प्रवेशाच्या तिसऱया यादीच्या कटऑफपेक्षाही जास्त आहे. झेवियर्स कॉलेजची सायन्सची कटऑफ खाली येण्याऐवजी 2.6 टक्क्यांनी वाढली आहे. तर साठये कॉलेजचा सायन्सचा कटऑफही 88.6 टक्क्यांवरून थेट 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. मिठीबाई कॉलेजचा आर्ट्सचा कटऑफ 86.4 वरून विशेष यादीत 88 टक्क्यांवर गेला आहे. सर्वात विक्रमी वाढ वझे-केळकर कॉलेजच्या आर्ट्सच्या कटऑफमध्ये झाली आहे. आर्ट्सचा कटऑफ 90.4 टक्क्यांवरून 96.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. पहिल्या तीन प्रवेश फेऱयांमध्ये पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत पुन्हा प्रवेशाची संधी दिल्यामुळे कटऑफमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, विशेष गुणवत्ता यादीत 64 हजार 866 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.

विशेष गुणवत्ता यादीसाठी मुंबई विभागात एकूण 1 लाख 45 हजार 473 जागा उपलब्ध होत्या. या जागांवरील प्रवेशासाठी 76 हजार 203 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. यादीतील प्रवेशानंतर अकरावीच्या सुमारे 80 हजार 607 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी 25 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या यादीत सर्वाधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे कॉलेज देण्याचा प्रयत्न शिक्षण संचालनालयाने केला आहे. एकूण 38 हजार 871 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले आहे. आर्ट्स शाखेच्या 4389, कॉमर्स शाखेच्या 20,167, सायन्सच्या 13,711 आणि एचएसव्हीसी शाखेच्या 604 विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

काही कॉलेजांचे कटऑफ

कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स
जयहिंद 80.4 88 69.8
केसी 60 86.8 70.4
झेवियर्स – – 92.4
रुईया 79.8 – 83.4
पोदार – 82.8 –
रुपारेल 56.2 83.8 80.6

शाखानिहाय झालेले प्रवेश

आर्ट्स 5279
कॉमर्स 37,485
सायन्स 21,479
एचएसव्हीसी 623