मुलाखत – धारावीत बचावापेक्षा हल्ल्याची रणनीती यशस्वी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील अडीच चौरस किलोमीटरमध्ये सुमारे 10 लाखांची लोकसंख्या असलेली धारावी कोरोनाची हॉटस्पॉट बनली त्यावेळी धारावीसह आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग पसरेल अशी शंका होती. मात्र, मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने तातडीने केलेल्या उपाययोजना आणि राबवलेली ‘मिशन धारावी’सारख्या विशेष मोहिमेने ही शंका खोटी ठरवली. धारावीची भौगोलिक रचना बघता कोरोनापासून बचाव करण्यापेक्षा कोरोनावर हल्ल्याची रणनीतीच यशस्वी ठरली. याबद्दल ‘जी/उत्तर’चे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर  यांच्याशी दै. ‘सामना’ने खास बातचित केली.  

कोरोना नियंत्रणावेळी कोणत्या अडचणी आल्या?

– धारावीत सुमारे 70 टक्के लोक हे सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहेत. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित कामगार असल्यामुळे घरात स्वयंपाकघरच नाही अशांचे खाणे-पिणे बाहेर होत होते. या गोष्टी रोखणे शक्य नव्हते. त्यात लोकसंख्या इतकी दाटीवाटीची आहे की, कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर ते आपल्याकडे येण्याआधीच आपण त्यांच्याकडे पोहोचलो पाहिजे, याकडे आम्ही लक्ष पुरवले. कोरोनापासून बचावापेक्षा कोरोनावर हल्ला करण्याची रणनीती आम्ही बनवली. स्क्रिनिंग, फिव्हर कॅम्प, धारावीतील खासगी डॉक्टरांचा सहभाग, आयसोलेशन, क्वॉरंटाईन सेंटर्स, स्थलांतरित कामगारांना दरदिवशीचे खाणे पिणे पुरवणे, या सगळ्याच गोष्टी कोरोनाला रोखण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या.

सर्व समाजघटकांचे सहकार्य मिळाले का?

– ही सीमेवरची लढाई नव्हती तर घरातली लढाई होती. त्यामुळे कोरोनाविरोधात धारावीतील सगळ्यांची तशी मानसिकता बनवणे आवश्यक होते. कोरोनाविरोधात जनजारुकता करण्यापासून ते लोकांना यात सहभाग करून घेण्यापर्यंत हा एक मोठा लढा होता. धारावीकरांनीही आमचा हेतू समजून घेतला आणि आम्हाला सहकार्य केले. कोरोनाच्या नियंत्रणात सर्वात मोठे योगदान तर धारावीकरांचेच आहे.

 

सर्वांची साथ, सर्वांचा विश्वास महत्त्वाचा ठरला?

– कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना केल्या. पण त्याला धारावीकरांची साथ मिळाली नसती तर कोरोना नियंत्रणाचे मिशन धारावीत कधीच यशस्वी झाले नसते. स्थानिक डॉक्टर, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पालिका कर्मचारी, आमचे वरिष्ठ यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली, मार्गदर्शन केले. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आमच्यावर विश्वास टाकून राबवलेल्या प्रत्येक नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले, शाबासकी दिली. त्यामुळेच हे शक्य झाले.

धारावीबाबत माध्यमांची भूमिका काय होती?

– माध्यमांनी ‘मिशन धारावी’ला महत्त्व दिले, प्रसिद्धी दिली. सुरुवातीला नकारात्मकतेकडे झुकणारी प्रसिद्धी मग सकारात्मकतेमध्ये बदलली आणि नंतर धारावीची खर्‍या अर्थाने ‘पॉझिटिव्ह’ प्रसिद्धी झाली. त्याचा धारावीकरांना फायदा झाला. धारावीकडे स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांच्या मदतीचा ओघ वाढला. मात्र, कोरोनामुक्तीचा, नियंत्रणाचा ध्यास, धारावीकरांची चिकाटी, त्यांनी दिलेली साथ, पालिकेवर टाकलेला विश्वास यामुळे कोरोना नियंत्रण शक्य झाले.  

धारावीचा धडा देशाने गिरवावा! ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने घेतली विशेष दखल

एकवेळ धारावीतील कोरोनाची रुग्णसंख्या इतकी वाढली होती की, कोरोना रुग्णालये, सेंटर्समध्ये ‘आयसीयू’ बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे या दाटीवाटीच्या वस्तीकडे मुंबईसह देशाचे लक्ष लागले होते. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंग आणि रुग्णांचा शोध घेणे जवळजवळ अशक्य होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजना, कोरोना रोखण्यासाठी सर्व समाजघटकांचा सहभाग आणि धारावीकरांची चिकाटी यामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. धारावीत आज दिवसाला फक्त दोन-चार रुग्ण सापडत असून धारावी आता देश आणि जगात कोरोना नियंत्रणाचे आदर्श उदाहारण बनली आहे. कोरोनाचा कहर कितीही असला तरी त्यातून बाहेर पडता येते, हे धारावीने दाखवून दिले आहे. धारावीचा हा धडा संपूर्ण देशाने गिरवावा, असा सल्ला ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या विशेष लेखात दिला आहे. यात पालिकेच्या उपाययोजनांबरोबर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांचे मार्गदर्शन आणि जी/उत्तरचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले आहे.