
सामना प्रतिनिधी । मालवण
गाबीत समाज सिंधुदुर्गच्या वतीने येत्या १७ जुन रोजी सकाळी १० वाजता समाज बांधवांच्या महामेळाव्याचे आयोजन मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. गाबीत समाजातील बंधु आणि भगिनींनी मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण ताम्हणकर व जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विजयदुर्ग ते रेडी- आरोंदा- दोडामार्ग पर्यंत ठिकठिकाणी वास्तव्य करून असलेल्या गाबीत समाजातील लोकांना एकत्र आणून समाजप्रबोधन व्हावे व विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा उद्देश ठेवून या गाबीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गाबीत समाजाला राज्य शासनाकडून मिळालेल्या विशेष मागास प्रवर्गाच्या विविध शैक्षणिक व इतर सवलतींचा लाभ मिळविणे, गाबीत समाजातील बहुसंख्य लोकांचा मच्छीमारी व्यवसाय असल्याने त्यांची घरे किनारपट्टी परिसरात असून सीआरझेड कायद्यामुळे लोकांना घरे बांधणे व व्यवसाय करणे मुश्किल बनले आहे. याबाबत आवाज उठविणे, निलक्रांतीतून मच्छीमारी करणाऱ्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, समुद्री पर्यटन व्यवसायामध्ये मुला- मुलींना रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, समाजातील वधू- वरांच्या समस्या सोडविण्यासाठी वधू- वर सूचक मंडळे बळकट करणे गरजेचे आहे, असे ताम्हणकर यांनी म्हटले आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने अखिल भारतीय महासंघ मुंबई, तसेच गाबीत समाज मुंबई या शिखर संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी, कारवार, गोवा येथील विशेष अतिथी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील माजी आमदार, नगरसेवक, जि. प. व प.स.सदस्य ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, पर्यटन उद्योजक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. तसेच यानिमित्ताने गाबीत समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा मेळाव्यात सत्कार करण्यात येणार आहे.
गाबीत समाजाचा हा मेळावा यशस्वी होण्यासाठी देवगड तालुकाध्यक्ष संजय पराडकर, मालवण तालुकाध्यक्ष रविकिरण तोरसकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष वसंत तांडेल, मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सहदेव बापार्डेकर, तुळशीदास गावकर, रापण संघाचे अध्यक्ष दिलीप घारे, श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटु सावजी, जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, सिंधुदुर्ग जिल्हा महिला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर, अरविंद मोंडकर, अशोक तोडणकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, भाऊ मोर्जे व अन्य बांधव मेहनत घेत आहेत. संपुर्ण किनारपट्टीवरील गावांचा दौरा करुन समाजातील महत्वाच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. त्यामुळे समाज एकसंघ बनवण्याचे कामी लवकरच यश येईल असे मत जिल्हाध्यक्ष श्री. ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे.






























































