सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गडचिरोलीतील विषमुक्त शेतीचा उपक्रम कौतुकास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

492

सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात विषमुक्त शेती केली जात आहे. ती सर्व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे, हा उपक्रम चांगला असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात सांगितले. कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रमात ते महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची व्हीसीद्वारे संवाद साधत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम व्हीसी द्वारे उपस्थित होते.

चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटिकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपचे आयोजन करण्यात आले असताना शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन केले होते. त्यानंतर सायंकाळी राज्यस्तरावरून कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सेंद्रिय शेती गटाने सहभाग घेतला होता. जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे गट 31 आहेत. यातील प्रत्येक गट 50 एकर शेती सेंद्रिय स्वरूपात करत आहे. यातील चामोर्शी येथील एका गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी समारोप कार्यक्रमात जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीचे महत्व माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना सविस्तर सांगितले .

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “शेतकरी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता काम करतोय, कोरोना दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमाणात सर्व जनतेला शेतीमधून भाजीपाला, अन्नधान्य या बाबत मदत केलेली आहे. राज्याने हरित क्रांती करून चांगल्या पद्धतीने प्रगतशील शेतीकडे वाटचाल केली आहे” असे सांगितले.

विशेष म्हणजे या समारोपीय कार्यक्रमात राज्यातून गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेशही करण्यात आला होता. चामोर्शी कृष्णानगर येथील कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक आनंत पोटे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कराळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, दुग्धविकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या