अनंत चतुर्दशीनंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध; बुधवारी विराजमान होणार साखरचौथ बाप्पा

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला राज्यात सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होते. तर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या…अशा जयघोष करत बाप्पाला निरोप देण्यात येतो. राज्यभरात बाप्पाला निरोप दिल्यानंतर रायगडमध्ये बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते. या प्रथा सध्या वाढत असून याला लोकप्रियताही मिळत आहे.

रायगड आणि पेणमधील अनेक गावे ही बाप्पाची गावे म्हणून ओळखली जातात. या गावांमध्ये गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती साकारल्या जातात. हे काम एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे जसजसा गणेशोत्स जवळ येतो. तसे हे कारागीर कामात गुंतून जातात. भाविकांना योग्य वेळी गणेशमूर्ती देण्यासाठी ते रात्रीचा दिवस करतात. या सर्व कामाच्या गडबडीत त्यांना घरचा गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळातील बाप्पाचे अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या चतुर्थीला साखर चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीला हे कारागीर गणेशमूर्तीची स्थापना करून पूजा करतात. त्यामुळे याला साखरचौथ गणेशोत्सव म्हणतात. त्यामुळे गणपती कारागीरांपासून ही प्रथा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

साखरचौथ गणपती रायगड जिल्ह्यांत साजरा होणारा गणेशोत्सव आहे, जो अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) साजरा केला जातो. या गणपतींना ‘गौरा गणपती’ असेही म्हणतात आणि ते साधारणपणे अडीच ते पाच दिवसांसाठी असतात. तसेच २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात.

राज्यात आणि विशेष करून कोकणात गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. तसेच गेल्या काही वर्षात साखरचौथ गणपतीची प्रथा लोकप्रिय होत आहे. तसेच ज्यांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यांच्यासाठी साखरचौथ गणपती ही गणशपूजनासाठी पर्वणी ठरत आहे.