बाप्पा निघाले दरबाराकडे! ढोल-ताशाच्या मिरवणुकींनी लालबाग-परळ गजबजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, ढोल-ताशाचा गजर, पारंपरिक वेषभूषांमध्ये निघालेल्या गणपती बाप्पाच्या  आगमन यात्रांनी आज अवघे लालबाग-परळ गजबजून गेले. यातच रविवारचा मुहूर्त साधत गणेशभक्तांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. मोठ्या थाटात दरबाराकडे निघालेले बाप्पा आणि गणेशभक्तांचा उत्साह यामुळे भक्तीमय वातावरण तयार झाले.

लाखो भक्तांना आस लागून राहिलेला गणेशोत्सव अवघ्या 17 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मंडपातील सजावटीसाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाप्पाला मंडपात नेण्यासाठी आज सकाळपासूनच अनेक मंडळे गाड्या, मिरवणुकीच्या साहित्याच्या लवाजम्यासह लालबाग-परळमध्ये दाखल झाली. भगवे फेटे-सदरा घातलेले गणेशभक्त, जोडीला ढोल-ताशा, लेझिम पथक, पारंपरिक मिरवणुकीत बाप्पा आपल्या दरबारात विराजमान झाले.

रविवारी  आगमन  झालेले बाप्पा

बाल गणेशचा बल्लाळेश्वर, मूर्तिकार राजन खातू

मुंबादेवीचा गणराज, स्लेटर रोडचा राजा, मुंबईचा सम्राट, ताडदेवचा राजा, मूर्तिकार कृणाल पाटील

करीरोडचा कैवारी, मूर्तिकार राजन झाड

अखिल चंदनवाडी, मूर्तिकार रेश्मा खातू