दखल – रोमहर्षक मुक्तिलढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  • गणेश उदावंत

मराठवाडा या भूप्रदेशाने संघर्षातून स्वातंत्र्य मिळविले आहे. याकरिता अनेकांनी घरावर तुळशीपत्र ठेवून भूमिगतपणे लढा पुकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश इंग्रजांच्या कराल दाढेतून मुक्त झाला खरा, पण महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांत, तेलंगणा व कर्नाटकचा बहुतांश भूप्रदेश हैदराबादच्या निजाम संस्थानाच्या जुलमी राजवटीत साखळदंडाने बांधला गेला होता. पारतंत्र्याचा हा साखळदंड तोडण्यासाठी जो लढा उभारला गेला, तो मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणून इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.

स्वामी रामानंद तीर्थ, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ संपादक अनंत भालेराव, आ. कृ. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंह चौहान, शंकरसिंह नाईक, गोविंदराव पानसरे, चारठाणकर, हुतात्मा बहिर्जी, माधवराव कुलकर्णी यांच्यासह ज्ञात व अज्ञात सन्मित्रांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढय़ाचा महायज्ञ तेवता ठेवला.

अशा या लढय़ातील एक ध्येयवादी स्वातंत्र्यसैनिक स्व. माधवराव कुलकर्णी यांनी ‘मुक्तिपर्व’ या पुस्तकातून संग्रामाच्या लढय़ातील आपल्या देशभक्तिपर कार्याची रोमहर्षक माहिती ‘जसे सुचले, तसे लिहिले’ अशा स्वरूपात दिली आहे. या लढय़ात ते तरुणपणीच हिरिरीने सहभागी झाले. कळमनुरी (जि. हिंगोली) येथील मूळ रहिवासी असलेले माधवराव कुलकर्णी यांनी शिक्षणासोबतच नाशिकमधील भोसले मिलिटरी स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले. मात्र देशप्रेमाच्या तळमळीतून त्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडून तत्कालीन हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. याच वेळी ऑगस्ट 1947 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी तिरंगी झेंडा चळवळ सुरू केली. या चळवळीच्या माध्यमातून माधवराव कुलकर्णींचा लढय़ात सहभाग वाढला, तो कायमचा. मनमाड येथून शस्त्र्ाास्त्र्ा व दारूगोळा आणणे, पटरी अॅक्शन, सशस्त्र्ा पॅम्प, बामणी हल्ला, जयपूर अॅक्शन, दुधा गढीस वेढा, आजेगावचा लढा, मन्नास पिंप्री हल्ला, लुटारू पठाणांचा बंदोबस्त आणि ऑपरेशन पोलोमध्ये सहकार्य, शेवटी गोवा मुक्तिसंग्रामातील कार्याचा आढावा ‘मुक्तिपर्व’मध्ये त्यांनी रंजकपणे मांडला आहे. तो थरारक असाच आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढय़ातील यशस्वी कामगिरी केल्यानंतर माधवराव कुलकर्णी शिस्तीचे शिक्षक म्हणून कार्यरत झाले.  अवघे 100 पाने असलेले हे पुस्तक आकाराने लहान असले तरी त्याची व्याप्ती मोठी आहे. या पुस्तकास ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. या मुक्तिसंग्रामातील योद्धय़ाची ही मनोगतपर आत्मकथा वाचनीय व प्रेरक अशीच आहे.

मुक्तिपर्व

लेखक – स्वातंत्र्यसेनानी माधवराव कुलकर्णी

प्रकाशक – प्रतिभा प्रकाशन

पृष्ठ – 100, मूल्य – रुपये 150/-