
राज्यात तसेच देशात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असताना सातासमुद्रापार लंडन शहरातही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष दुमदुमला. लंडनच्या हौन्सलो गणेशोत्सव मंडळाचा उत्सव मोठय़ा जल्लोषात पार पडला. दीड दिवसांच्या गणरायाचे थेम्स नदीत विसर्जन करण्यात आले. मंडळाचे यंदाचे 15 वे वर्ष होते.
हौन्सलो गणेशोत्सव मंडळाने यंदा चार फुट उंच मूर्तीची प्रतिष्ठापना केली. चारकोप, कांदिवली येथून ही मूर्ती लंडनला नेण्यात आली. गणेशचतुर्थीच्या दिवशी हौन्सलो येथे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या उत्सवात तीन ते साडेतीन हजार लोक सहभागी झाले. केवळ मराठीच नव्हे तर लंडनचे गोरे लोकही मोठय़ा संख्येने सहभागी झाले, अशी माहिती हौन्सलो गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक वैभव रावराणे यांनी दिली. महेश शेट्टी, सुजय सोहनी, हेमंत पेंडसे, सोनाली बोरकर, नितीन पार्ते, सूरज लोखंडे या सदस्यांनी मेहनत घेतली.
सांस्कृतिक कार्यक्रम
उत्सवाचा पहिला दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगला. आरती, अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी ड्रॉइंग, फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. मुलांसाठी क्ले मॉडेलिंग स्पर्धा घेण्यात आली. क्ले मॉडलिंगसाठी मुलांना ‘गणेश’ ही संकल्पना देण्यात आली. प्रौढांसाठी चित्रकला स्पर्धा, आणि ‘तेरा मेरा साथ रहें’ ही नृत्य, गाणे वा अभिनयाची अनोखी स्पर्धा घेण्यात आली. ‘हौन्सलो गॉट टॅलेंट’ या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला
दुसऱया दिवशी बार्ंमगहमच्या ‘ढोल ड्रम्स’ ग्रुपच्या सादरीकरणाने साऱयांचे मन जिंकून घेतले. तसेच मुलामुलींच्या लेझीम पथकाने रंगत वाढवली. ढोल, लेझीम, डिजेच्या तालावर विसर्जन मिरवणूक निघाली. लोक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. त्यानंतर थेम्स नदीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.



























































