रत्नागिरीत भरपावसात गौरी गणपतींचे भक्तीभावात विसर्जन

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात भरपावसात गौरी गणपतीला रत्नागिरीत भक्तीभावात निरोप देण्यात आला. मंगळवारी सायंकाळी गौरी गणपतींना निरोप देण्यासाठी वरूणराजाही हजर होता.भरपावसात बाप्पाही चिंब भिजले.जिल्ह्यात आज 1 लाख 14 हजाराहून अधिक घरगुती गणपती आणि 16 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

10 सप्टेंबरपासून जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. जिल्ह्यात 108 सार्वजनिक आणि 1 लाख 66 हजार घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी गौराईचे आगमन झाले. सोमवारी घरोघरी मंगलमय वातावरणात गौरी पूजन झाल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर गौरी गणपतींना भक्तीभावात निरोप देत विसर्जन करण्यात आले. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जनासाठी गर्दी झाली होती.

गर्दी टाळण्यासाठी केवळ गणेश विसर्जन करायचे असलेल्या व्यक्तींनाचा पोलीस मांडवी समुद्रावर प्रवेश देत होते. त्यामुळे बाप्पांचे विसर्जन पहाण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांना समुद्रावर पोहचण्यासाठी अन्य गल्लीबोळातील मार्ग शोधावे लागले. सायंकाळी पावसाने जोर धरल्याने गणपती बाप्पांनाही यंदा पावसात चिंब भिजावे लागले. पाऊस पडत असल्याने गणेशमूर्ती प्लास्टिक कागदातून आणल्या जात होत्या. समुद्रावर येताच गणेशमूर्तींची पूजाअर्चा आणि आरती करून विसर्जन करण्यात येत होते.

आपली प्रतिक्रिया द्या