कोल्हापूरात विसर्जन केलेल्या गणेशमुर्ती यांत्रिकी पद्धतीने पाण्यात सोडण्याचा उपक्रम

विसर्जन केलेल्या गणेशमुर्ती यांत्रिकी पद्धतीने पाण्यात सोडण्याचा अभिनव प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी केला आहे. एका ट्रकमधील शेकडो मुर्तीं अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पाण्यात सोडता येणे शक्य झाले आहे. राज्यात अशाप्रकारचा पहिलाच हा प्रयोग आहे.

शहरात सुमारे एक लाखाहून अधिक घरगुती गणेश मुर्तींचे ठिकठिकाणी विसर्जन होते. विसर्जित केलेल्या या सर्व मुर्ती एकत्रित करुन त्या रंकाळा तलाव परिसरात इराणी खणीत सोडल्या जातात. या मुर्तीं पाण्यात सोडताना कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत. विटंबना होत असल्याच्या तक्रारी होऊन वातावरण तंग होऊ नये, यासाठी विसर्जन केल्यानंतर आणलेल्या अशा हजारो मुर्ती या खणीत योग्य पद्धतीने सोडण्यासाठी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ” बेल्ट कन्वेअर ” या यांत्रिकी पद्धतीला मुर्त स्वरुप दिले आहे. एकप्रकारे सरकत्या जिन्याप्रमाणे याचे कार्य चालते.

खणीच्या काठावर हे यंत्र ठेवत त्याचा सरकता जिन्याप्रमाणे लोखंडी भाग पाण्याच्या मधोमध सोडण्यात येतो. त्यावरुन या मुर्तीं पाण्यात अलगद सोडता येतात. खणीच्या कोणत्याही भागात याद्वारे मुर्ती सोडता येते.

कमी वेळेत विसर्जनासाठी प्रयत्नशील – नेत्रदीप सरनोबत
शहरात ठिकठिकाणी विसर्जन केलेल्या मुर्ती महानगरपालिकेच्या वतीने इराणी खणीत सोडल्या जातात. सुमारे 40 हजारहून अधिक घरगुती गणेशमुर्तीं येथे सोडल्या जातात. तराफाच्या साह्याने या मुर्तीं पाण्यात सोडताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. शिवाय यामध्ये भरपूर वेळ लागतो. पण या यांत्रिकी पद्धतीने अवघ्या 10 ते 15 मिनिटांत एका ट्रकमधील मुर्ती सुरक्षितपणे पाण्यात सोडता येते. यामध्ये सुधारणा करुन पुढीलवर्षी सर्वत्र अशी यांत्रिकी पद्धत वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शिवाय यामुळे अनावश्यक गर्दीही होणार नसल्याचे नेत्रदीप सरनोबत यांनी ‘दैनिक सामना’ला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या