Ganeshotsav 2021 – यंदा नारळाची उलाढाल वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांकडून नारळाला मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे नारळाची विक्री कमी झाली होती. यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे गणरायाला अर्पण करण्यासह प्रसाद, मोदक तयार करण्यासह हॉटेल व्यावसायिकांकडून सर्व प्रकारच्या नारळांना चांगली मागणी आहे. यंदा नारळाचे उत्पादन चांगले झाल्याने दर स्थिर असून, नारळाची उलाढाल वाढणार असल्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून वर्तविली जात आहे.

मार्केटयार्डात दररोज दहा ते पंधरा ट्रकमधून सुमारे दोन ते चार लाख नारळ दाखल होत आहेत. यामध्ये नव्या नारळासह मद्रास, पालकोल, साफसोल आदी नारळांचा समावेश आहे. बाजारात दाखल होणाऱ्या नारळामध्ये निम्म्याहून जास्त पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या नारळाची आवक होत आहे. तामिळनाडू व आंध्र प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नेहमीच्या तुलनेत नारळाची आवक घटली आहे, अशी माहिती नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.

नारळाचे चार प्रकार असतात. आकाराने छोटा व मध्यम असलेला नवा नारळ हा धार्मिक विधीसह सत्कारासाठी वापराला जातो. घरगुती ग्राहकांकडून नारळाला मागणी कायम आहे. मात्र, कोरोनामुळे मंदिरे बंद तसेच उत्सवावर मर्यादा आल्याने तोरण तसेच पूजेसाठी होणारी मागणी यंदा नाही. आंध्र प्रदेशचा पालकोल तसेच मद्रास नारळास किराणा दुकानदारांकडून मोठी मागणी राहते. हा नारळ घरगुती स्वयंपाकातही वापरला जातो. साफसोल नारळ आकाराने मोठा व जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक,खानावळ, केटरिंग व्यावसायिकांकडून या नारळाला मोठी मागणी राहते. मोदकांसाठी मद्रास आणि साफसोल नारळाला मागणी असते.

“सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. त्यामुळे तोरणांसाठी लागणाऱ्या नारळांना मागणी घटली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदादेखील नारळांना मागणी कमी आहे. मात्र, गेल्यावर्षीपेक्षा तुलनेने यंदा नारळाची आवक आणि मागणी चांगली आहे”  दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केटयार्ड.