मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी, रस्त्यावर चार ते पाच किमीच्या लांबलचक रांगा; गणेशभक्त हैराण

गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून साजरा करण्यात येत असून शनिवार, 23 ऑगस्टपासून चाकरमान्यांनी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आपल्या गावी जाण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम, महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे याचा फटका चाकरमान्यांना सहन करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. तसेच इतर तीनही महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू होती. यामुळे चाकरमान्यांना नियोजित स्थळी पोहचण्यास उशीर झाला. रेल्वे स्थानक, एसटी डेपो आणि खासगी बस थांब्यांवर गणेशभक्तांनी कोकणात जाण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

तीन दिवसांवर गणेशोत्सव आल्याने चाकरमान्यांनी शनिवारपासून आपापल्या गावची वाट धरली आहे. मात्र त्यांना रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाचा फटका बसला. माणगावजवळ बाजारपेठ परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती. सुमारे कोकणात जाणाऱ्या मार्गावर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस विभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. चाकरमान्यांच्या सोयीसाठी सुविधा पेंद्र स्थापन केली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या या सर्व प्रयत्नांवर रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाने पाणी फेरले असून चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

z काही दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा केला होता. यावेळी गणेशोत्सवापूर्वी महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याच्या सूचना त्यांनी महामार्ग प्राधिकरणाला केल्या होत्या, मात्र अद्यापही मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे तसेच असल्याचे चित्र दिसून येते.

कोकण रेल्वे तीन ते चार तास विलंबाने

यंदा गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून मध्य आणि पश्चिम रेल्वेने गणपती विशेष गाडय़ांची व्यवस्था केली आहे. गणेशोत्सव काळात एकूण 380 विशेष गाडय़ा प्रवासी सेवेत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडय़ांमुळे अनेकांना ‘कन्फर्म तिकीट’ मिळाल्याचा आनंद झाला. मात्र शनिवारी कुटुंबासह कोकण रेल्वेमार्गावर जादा गाडय़ांतून प्रवासाला निघालेल्या चाकरमान्यांचा तीन ते चार तासांच्या विलंबाने हिरमोड झाला. नियमित गाडय़ा आणि जादा गाडय़ांचे शेडय़ुल सांभाळणे रेल्वे प्रशासनाच्या नाकीनाऊ आले आहे. त्यामुळे प्रवाशांची लटपंती झाली असून जादा गाडय़ांचे तिकीट मिळूनही आम्हाला रस्त्यावरील वाहतूककोंडीसारखाच मनस्ताप झाल्याची नाराजी अनेक चाकरमान्यांनी व्यक्त केली.