
>>वैशाली गव्हाणकर, संचालिका ग्यानमुद्रा एज्युकेशन
गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर लहान मुलांच्या आनंदाला उधाणंच येतं. कारण सुट्टी म्हटली की, अभ्यासाचा ताण नसतो की शाळेला जायची गडबड नसते. गणपतीच्या सुट्टीचं नाव काढलं की, फक्त मज्जा आणि धांगडधिंगा. इतकंच काय ते मुलांना माहीत. सुट्टीत मुलांची मज्जा असली तरी मुलांचे हट्ट आवरता आवरता पालकांची पुरती दमछाक होते. कारण मोदक बनवण्यापासून ते बाप्पाची आरास करे पर्यंत सर्वच कामं मुलांनाच करायची असतात. त्यांना शांत करण्यासाठी म्हणून कोणतंही बारीक सारीक काम दिलं की, मुलं तिथेही गोंधळ घालून ठेवतात. त्यामुळे त्याच्यावर डोळ्यांत तेल घालून बारीक नजर ठेवावी लागते. सणसमारंभातली ही वाढीव कामं आवरताना या मुलांना ताळ्यावर आणायचं तरी कसं? हा प्रश्न सर्वच पालकांसमोर ठाण मांडून बसतो. मात्र पालकांनी जर यातून मध्य शोधून काढला तर मुलंही मदत करण्यात रमतील व पालकही निश्चितपणे आपली कामे करू शकतील.
आरासमध्ये मदत घ्या लहान मुलांची :
बऱ्याचदा आपण गणपतीची आरास करण्यासाठी बाजारातून तयार मखर आणतो. शिवाय आजकाल सर्वच गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्याने आरास करण्यासाठी प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा मोत्याच्या माळा आणि सजावटीच्या इतर गोष्टींचा वापर करतो. त्याऐवजी मुलांच्या मदतीने पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून घरच्याघरी सजावट तयार केली तर मुलांचाही आनंद वाढेल व त्यांना पर्यावरणपुरकतेचे महत्त्वही समजावून सांगता येईल.
मुलांच्या कल्पनांना प्रत्यक्षात साकारा :
बाप्पाचं आगमन होणार म्हटल्यावर घराचा चेहरामोहराच बदलून जातो. त्यामुळे घराची सजावट करताना मुलांच्या कल्पना अगदी लहानसहान बाबतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जसं की, रांगोळीत कोणते रंग भरायचे? पाहुणचाराची तयारी करताना काय खाऊ बनवायचा? सरबत कोणते बनवायचे? यासारख्या अगदीच किरकोळ गोष्टींत मुलांचे मत लक्षात घ्या. जेणेकरून त्यांनाही समाधान वाटेल व आपल्यालाही मदत होईल.
खरेदीची जबाबदारी मुलांना द्या :
प्रत्यक्ष खरेदीची जबाबदारी मुलांवर टाकता येत नसली तरी मुलांना शक्य होईल अशा साहित्याच्या खरेदीची यादी मुलांनाच बनवायला सांगा. ज्यामुळे त्यांना पैशाचे नियोजन कसे करतात? हेही शिकवता येईल. तसंच काटकसरीचं महत्त्व लक्षात आल्यावर पुढच्या वेळी मुलं स्वतःहूनच तुम्हाला काटकसर करायला सुचवतील.
नैवेद्य बनवताना मुलांना हाताशी घ्या :
गणपतीचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक. मोदकाची पारी करण्यातली गंम्मत त्यांना शिकवा. शिवाय नैवेद्याचे ताट वाढताना त्यांची मदत घ्या. जेणेकरुन सोप्यात सोप्या कामात त्यांचा हातभार लागेल. तसेच ते ननवीन गोष्टीही शिकतील.
पूजेच्या तयारीत मुलांना हाताशी घ्या :
पूजेसाठी फुलांच्या पाकळ्या करण्याची कामं मुलांना सहज द्या. शिवाय त्यांना दुर्वा निवडायला शिकवा. त्यांना 21 दुर्वांच्या जुड्या बनवायला सांगा. मुलांनी केलेल्या कामाचं आवर्जून कौतुक करा. जेणेकरुन त्यांनाही प्रोत्सहन मिळेल व त्यांच्या उत्साहात भर पडेल.
या छोट्याशा प्रयत्नाचे फायदे मात्र नक्कीच फायद्याचे ठरतील.
1. मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळेल.
2. त्यांच्या कलात्मक गुणांना वाव मिळून त्यांना सर्जनशील विचार करण्याची सवय लागेल.
3. सध्या कमी होत चाललेला कुटुंबातला संवाद वाढण्यास हे वातावरण नक्कीच पोषक ठरेल.
4. मुलांवर कामाची जबाबदारी दिल्याने त्यांना नियोजनाचे महत्त्व कळेल.
5. मुलांच्या उत्साहात भर पडेल. तसेच त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागेल.


























































