मूर्तीच्या मर्यादेमुळे गणेशोत्सव मंडळे संभ्रमात,ऑनलाइन नोंदणीनंतर आता हमीपत्राचे विघ्न

गणेशोत्सव मंडळांना मूर्तीच्या उंचीचे बंधन नसताना पालिकेने ऑनलाइन अर्जाच्या हमीपत्रात मात्र शाडूची, पर्यावरणपूरक मूर्ती आणि 4 फुटांची मर्यादा राखण्याचे बंधन घातल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संभ्रमात सापडली आहेत. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीच्या हमीपत्रामधील मूर्तीबाबतचा नियम तातडीने बदलावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीकडून करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाइन आणि शुल्क वॉर्ड विभागात या अटीमुळे मंडळे संभ्रमात आहेत. त्यामुळे पालिकेने हमीपत्रात आवश्यक बदल करावेत, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर आल्यामुळे सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवासाठी मोठी सजावट करीत असल्यामुळे महिनाभर आधीच मूर्ती मंडपात आणतात. मात्र गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेची परवानगी अनिवार्य आहे. मात्र या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘पीओपी’ची मूर्ती करण्याची मुभा मिळाली असल्याने उत्साह वाढला आहे. त्यामुळे भव्य मूर्ती आणण्याचे नियोजन मंडळांचे आहे. मात्र पालिकेने ऑनलाइन अर्जासोबत द्यावयाच्या हमीपत्रात 4 फुटी पर्यावरणपूरक मूर्तीचे बंधन घातल्याने मंडळे संभ्रमात असल्याचे नरेश दहिबावकर यांनी सांगितले. गणेशोत्सव तोंडावर आला असताना अनेक मंडळे अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे.

 असे आहे सध्याचे हमीपत्र

  • 4 फुटांची शाडूची किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
  • शाडूच्या मूर्तीच्या मागे हिरवी खूण करावी
  • ‘पीओपी’ मूर्तीच्या मागे लाल खूण करावी
  • विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास प्राधान्य
  • ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेऊ
  • पालिका आणि पोलिसांची नियमावली पाळणार
  • विशिष्ट परिस्थितीत परवानगी रद्दचा अधिकार पालिकेला
  • उत्सवासंदर्भात वेळोवेळी घालून दिलेले नियम पाळणार

पालिकेने सध्या अनिवार्य केलेले हमीपत्र कोविड काळातील गणेशोत्सवासाठी पालिका प्रशासनाकडून खास प्रसारित करण्यात आले होते; मात्र आता कोरोना नसताना पुन्हा जुनेच हमीपत्र अनिवार्य केल्याने मंडळे अडचणीत सापडली आहेत.

  • नरेश दहिबावकर, अध्यक्ष, गणेशोत्सव समिती