
पुण्यात मालकीची जागा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील पाच हजारांची रोकड लुटल्याची घटना महंमदवाडीतील लक्ष्मीनगरमध्ये घडली. याप्रकरणी तरूणाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सहा ते सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणाची महंमदवाडीतील लक्ष्मीनगरमध्ये मोकळी जागा आहे. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार तरूण मित्रांसह त्याठिकाणी गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या टोळक्याने तरूणाला पुन्हा त्याठिकाणी न येण्याची धमकी देत मारहाण केली. त्यामुळे परिसरातील नागरकिांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यानंतर टोळक्याने तरूणाला दुचाकीवर बसवून दुसऱ्या ठिकाणी नेत मारहाण करत त्याच्या खिशातील पाच हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर अधिक तपास करीत आहेत.
मेट्रोचे रॉड चोरणाऱ्याला अटक
मेट्रोच्या कामासाठी असलेले आठ लोखंडी रॉड चोरी करून रिक्षात नेणाऱ्या चोरट्याला मेट्रोच्या पेट्रोलिंग अधिकाऱ्याने पाठलाग करून पकडले. सचिन शाम गोहीरे (रा. वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बादशाह शेख (वय 65, रा. औंध) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



























































