गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी, तळोजा तुरुंगात रवानगी

भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांची बुधवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याने उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गायकवाड यांच्यासह पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गायकवाड आणि आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि मिंधे गटाचे महेश गायकवाड यांच्यात द्वारली गावातील एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की केली. त्याची तक्रार देण्यासाठी भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्या पाठोपाठ महेश गायकवाड त्यांच्या गुंडांसह पोहोचले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर दोन्ही गट बसलेले असताना त्यांच्यात राडा झाला आणि गणपत गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून महेश गायकवाडवर गोळीबार केला.