गणपती स्पेशल गाड्यांचे ग्रुप बुकिंग फुल्ल

18

सामना ऑनलाईन । मुंबई

कोकणात गौरी-गणपतीच्या सणाला जाणाऱ्या भक्तांच्या सोयीकरिता एसटी महामंडळाकडून सोडण्यात येणाऱ्या २,२२५ बसगाड्यांपैकी मुंबई विभागातील ५०० पेक्षा जास्त गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. प्रवाशांसाठी ग्रुप बुकिंग आरक्षण १ ऑगस्टपासून खुले करण्यात आले असून त्यास तुफान प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या वर्षी २,१२१ बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाड्या सोडतानाच त्यावेळी १३०० पेक्षा जास्त गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले होते. एसटी महामंडळाकडून ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीदरम्यान २,२२५ जादा बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरूनगर, पनवेल, उरण या मुंबई विभागाच्या आगारांतील एकूण ५०० पेक्षा जास्त गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. ग्रुप बुकिंगसाठी महामंडळाने १ ऑगस्टपासून आरक्षण उपलब्ध केले आहे.

मुंबई विभागामधील मुंबई सेंट्रल आगारातील तर २५९ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. हे आरक्षण ८ ते १२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे. ११ सप्टेंबर रोजीच्या तब्बल १८९ गाड्यांचे ग्रुप बुकिंग फुल्ल झाले आहे. ग्रुप बुकिंगसाठी प्रवाशांना जवळच्या आगारात संपर्क करण्यास सांगितले आहे. एसटीचे गणपतीसाठीचे संगणकीय आरक्षण ९ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. https://public.msrtcors.com या महामंडळाच्या बेवसाइटवरून एसटीचे संगणकीय आरक्षण करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या