
बुरुडगाव कचरा डेपो परिसरात रस्ते व लाईटच्या सुविधा न दिल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तसेच ग्रामस्थांना आश्वासन देऊनही पाणीपुरवठा न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी महापालिकेच्या कचरा गाडय़ा अडवून बुरुडगाव डेपोला टाळे ठोकले आहे. कचरा डेपोसाठी ग्रामपंचायतीने दिलेली ‘ना हरकत’ रद्द केल्याचे पत्रही ग्रामपंचायतीने महापालिकेला सादर केले आहे. दिवसभर डेपो बंद असल्यामुळे कचरा गाडय़ा तशाच परत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे शहरात कचराकोंडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेच्या बुरुडगाव कचरा डेपो येथील सुविधा, ग्रामपंचायतीला केला जाणारा पाणीपुरवठा आदी मुद्यांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. बुरुडगाव कचरा डेपो परिसरात रस्ते, लाईटच्या सुविधा तसेच महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्याच्या अटीवर बुरुडगाव ग्रामपंचायतीने महापालिकेला कचरा डेपोसाठी ना हरकत दिली होती. तसेच बुरुडगाव येथे 100 टन क्षमतेचा प्रकल्प असून, या डेपोत 100 टन कचरा पाठवावा. उर्वरित 50 टन कचरा सावेडी डेपोमध्ये पाठवावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी याकडे लक्ष वेधूनही महापालिकेने आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे 21 मार्च रोजी या संदर्भात महापालिकेला आंदोलनाचे पत्रही दिले होते. त्याची दखल महापालिकेकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, बुरुडगाव डेपोला टाळे ठोकण्यात आल्याचे सरपंच बापूसाहेब कुलट यांनी सांगितले.
आंदोलनाची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शंकर शेडाळे व अभियंता रोहिदास सातपुते यांनी ग्रामस्थांशी व ग्रामपंचायत पदाधिकाऱयांशी चर्चा केली. उद्या (दि. 6) यासंदर्भात महापालिकेत बैठक घेऊन विषय मार्गी लावले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, बुरुडगावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवत कचरा डेपो उघडणार नसल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी महापालिकेत बैठकीला येणार नाहीत. महापालिकेच्या अधिकाऱयांनी बुरुडगावला येऊन तेथील ग्रामस्थांसमोर बैठक घ्यावी, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
या वेळी सरपंच बापूसाहेब कुलट, उपसरपंच सिराज शेख, खंडू काळे, दिलीप पाचारणे, किशोर कर्डिले, राजू क्षेत्रे, महेश निमसे, पांडू जाधव, अक्षय चव्हाण, जालिंदर वाघ, विजय कदम, संजय फुलारे, संभाजी जाधव, उमेश कुलट, नितीन जाधव, मोहन काळे, संकेत तारडे आदी उपस्थित होते.

























































